मुंबई-पुणे टोलवसुली बंद करा
By admin | Published: January 31, 2017 12:50 AM2017-01-31T00:50:58+5:302017-01-31T00:50:58+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दिलेल्या कंत्राटाची रक्कम कंत्राटदाराने वसूल केल्याचा दावा चार सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे.
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दिलेल्या कंत्राटाची रक्कम कंत्राटदाराने वसूल केल्याचा दावा चार सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे संबंधित टोलवसुली बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्यथा मुख्यमंत्री आणि सा.बां. मंत्र्यांविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
प्रवीण वाटेगावकर, श्रीनिवास घाणेकर, विवेक वेलणकर आणि संजय शिरोडकर अशी चारही सामाजिक कार्यकर्त्यांची नावे आहेत. यापैकी वाटेगावकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ९१८ कोटी स्वीकारून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट १५ वर्षांसाठी वसुलीसाठी दिले होते. या १५ वर्षांच्या कालावधीत कंत्राटदार २ हजार ८६९ कोटी रुपये जमा करणार असल्याचे नमूद आहे. मात्र ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर होईपर्यंत कंत्राटदाराने एकूण २ हजार ८७६ कोटी रुपये जमा केलेले आहेत. त्यामुळे ठरलेल्या रकमेहून अधिक रक्कम कंत्राटदाराने वसूल केल्याचा दावा वाटेगावकर यांनी केला आहे.
याबाबतची सर्व माहिती सरकारकडूनच मिळाली असून त्याबाबत मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे कळविल्याचे वाटेगावकर यांनी सांगितले. शिवाय हा टोलनाका बंद करण्याची विनंती केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत कंत्राटदाराने ११ कोटी रुपये रक्कम जास्त जमा केली असून २०१९ पर्यंत टोलनाका चालू ठेवला तर १ हजार ५०० ते २ हजार कोटी रुपये कंत्राटदाराला अधिक मिळतील, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे येत्या १५ दिवसांत सरकारने याबाबतचा निर्णय घेतला नाही, तर मुख्यमंत्री, सा.बां. मंत्री व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे इतर शासकीय अधिकाऱ्यंविरोधात एसीबीकडे तक्रार दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)