शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पूर यांचा जवळचा संबंध - संजीव मेहता
By admin | Published: July 11, 2017 03:30 PM2017-07-11T15:30:26+5:302017-07-11T16:36:28+5:30
शाश्वत विकास साधायचा असेल, तर पाण्याचे योग्य नियोजन करायला हवे असे मत हिंदुस्थान युनिलिव्हरचे सीईओ संजीव मेहता यांनी व्यक्त केले.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - शाश्वत विकास साधायचा असेल, तर पाण्याचे योग्य नियोजन करायला हवे असे मत हिंदुस्थान युनिलिव्हरचे सीईओ संजीव मेहता यांनी व्यक्त केले. ते लोकमत वॉटर समिट 2017 च्या कार्यक्रमात बोलत होते. जलसमृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत लोकमत समूहातर्फे आज मंगळवार, ११ जुलै रोजी लोकमत वॉटर समिट २०१७चे आयोजन करण्यात आले आहे.
पुढे बोलताना संजय मेहता यांनी शेती आणि पाणी या विषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पूर यांचा जवळचा संबंध आहे. शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही, पाण्याचे नियोजन करण्यात अपयश आले आहे, हे चित्र आपल्याला बदलायला हवे. वॉटर टेबलची पातळी देशभर खालावत चालली आहे. पावसाचे पाणी पुरेसे आहे, पण त्याची साठवणूक होत नाही, ही समस्या आहे. पाण्याअभावी उद्योगांवरही परिणाम होईल. यावर ठोस उपाययोजना होणं गरजेच आहे.
जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन झाले. अंधेरी पूर्वेकडील आयटीसी मराठा येथे दुपारी १२.३० वाजता वॉटर समिटला प्रारंभ झाला. यावेळी जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह उपस्थित होते.
लोकमत मीडियाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी उद्घाटन सत्रात स्वागतपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी लोकमतच्या वाचकांचे आभार मानले. जलदूतांच्या जलकथांना राज्यातील लोकमतच्या वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना दर्डा म्हणाले, जलसंधारणाची राज्याला, मराठवाड्यासारख्या भागांना अतीव गरज आहे. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचे आहे, इस्रायलचे उदाहरण जगाने समोर ठेवावे. जलयुक्त शिवारचे यश महत्त्वाचे, पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणावा. यावेळी बोलताना त्यांनी जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या कामाचा गौरवही केला.
जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना भारतातील पाण्याची स्थिती आण जलयुक्त शिवाराचे काम का गरजेच आहे याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जगातील पाण्याची उपलब्धता दोन हजार वर्षांपूर्वी जेवढी होती, तेवढीच आजही आहे, पण लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे पाणी नियोजन महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे समाजाला पाणी संवर्धन करावे लागेल, त्याशिवाय देश पाणीदार बनू शकणार नाही.