महासत्तेकडे जाण्यासाठी प्राप्तिकर पद्धत बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 04:55 AM2017-12-27T04:55:03+5:302017-12-27T04:55:12+5:30
मुंबई : अमेरिका आणि चीनसारखे देश शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यांच्याप्रमाणेच आपणही गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे.
मुंबई : अमेरिका आणि चीनसारखे देश शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यांच्याप्रमाणेच आपणही गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. पुढच्या काही वर्षांत भारत महासत्ता होणार असल्याचे म्हटले जाते. पण, प्रत्यक्षात हे स्वप्न साकार करायचे असल्यास प्राप्तीकर पद्धत बंद करा, असे प्रतिपादन भाजपा नेते व खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.
व्हीजेटीआय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ‘भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यास आवश्यक तत्त्वे’ या विषयावर ते म्हणाले, मुळातच भारताची अधोगती ही स्वातंत्र्यापासून सुरू झाली आहे. कारण, भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी चुकीचे
धोरण स्वीकारले. त्यांच्या
धोरणामुळे आर्थिक महासत्तेकडे जाण्याची वाटचाल चुकीच्या पद्धतीने झाली.
स्वतंत्र भारतात आर्थिक धोरण स्वीकारताना रशियाचा आदर्श ठेवला गेला. त्यामुळे रशियाचे आर्थिक धोरण स्वीकारून आर्थिक वाटचाल सुरू केली. रशियाचे कृषीप्रधान धोरण भारताने स्वीकारले. त्यामुळे देशात जमीनदारी पद्धत अस्तित्वात आली. याची परिणीती म्हणजे देशाला अन्नटंचाईला सामोरे जावे
लागले. पण, त्यातून लाल बहादूर शास्त्री यांच्या धोरणामुळे देश बाहेर आला. त्यांनी स्वीकारलेल्या हरितक्रांती धोरणामुळे अर्थव्यवस्थेत सुस्थिती यायला लागली. आज याचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत.
संपूर्ण जगाला पोसायची धमक भारताकडे आहे. पण, यामुळे भारत महासत्तेकडे वाटलाच करताना
अडथळे येऊ शकतात. हे टाळण्यासाठी काही निर्णय बदलले पाहिजेत, असे मत सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले.
>संशोधनाची गरज
अमेरिकेत सातत्याने नवे संशोधन होत असते. नवनवीन उपक्रम तेथे राबविले जातात. पण, असे आपल्या देशात होताना दिसत नाही. नवीन गोष्टी करण्यासाठी भारतीय धजावत नाहीत. हे टाळण्यासाठी तरुणांनी संशोधन करण्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात झाल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल, अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले.