‘महाराष्ट्र केसरी’च्या दोन स्पर्धा बंद करा, चंद्रहार पाटील यांची मागणी; निर्णय न झाल्यास मार्चमध्ये मुंबईत धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:03 IST2025-02-19T14:03:05+5:302025-02-19T14:03:38+5:30
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

‘महाराष्ट्र केसरी’च्या दोन स्पर्धा बंद करा, चंद्रहार पाटील यांची मागणी; निर्णय न झाल्यास मार्चमध्ये मुंबईत धडक
सांगली : महाराष्ट्र केसरी ही कुस्ती क्षेत्रातील मानाची स्पर्धा आहे. एका वर्षात दोन - दोन स्पर्धा घेणे चुकीचे आहे. त्यातून अवहेलना होत आहे, ती त्वरित थांबवा. आम्हाला महाराष्ट्र केसरीच्या दोन स्पर्धा अमान्य आहेत. एकच स्पर्धा होईल, असा निर्णय घ्या. येत्या आठ दिवसात निर्णय झाला नाही तर मार्चमध्ये कधीही आम्ही राजधानी मुंबईला धडक देऊ, असा इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीत मंगळवारी दिला.
कुस्ती क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. त्याला राजकीय आणि कुस्ती क्षेत्रातील अनेकांनी पाठिंबा दिला. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासोबत चंद्रहार पाटील यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ विषयावर चर्चा केली. त्यांना निवेदनही देण्यात आले.
चंद्रहार पाटील म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा एकच व्हावी, ही त्यांची मुख्य मागणी आहे. संघटनांच्या वाद आणि श्रेयवादात कुस्तीचे नुकसान होत आहे. राज्यात एक खेळ, एक अधिकृत संघटना करावी. महाराष्ट्र केसरी पैलवानास एक कोटीचे बक्षीस आयोजकांकडून दिले जावे. तीनवेळा महाराष्ट्र केसरी झालेला पैलवान पोलिस उपाधीक्षक होतो, तसेच एकवेळ महाराष्ट्र केसरी झालेल्या पैलवानास पोलिस उपनिरीक्षकपदी नेमणूक मिळावी. एवढी मानाची स्पर्धा जिंकलेल्या मल्लाचे करिअर सुरक्षित करण्यास सरकारने प्राधान्य द्यावे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झालेला वाद बाजूला ठेवून पुढे जाण्याची आमची तयारी आहे. सरकारने आता नव्या धोरणावर विचार करावा. त्याआधी शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यावरील बंदी उठवावी. राज्य व राष्ट्रीय स्पर्धांत डोपिंग टेस्ट घ्यावी. जेणेकरून चुकीचे प्रकार थांबतील.
आमदार रोहित पाटील, कुस्तिगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, माजी आमदार शिवाजीराव नाईक, भाजप नेते पृथ्वीराज पवार, मराठा स्वराज्य संघाचे महादेव साळुंखे, मनोहर सारडा, कुस्तिगीर महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप बोंडवे, मुंबई महापौर केसरी देवेंद्र पवार, राजकुमार खरात आदींनी पाठिंबा दिला. शंभुराज कदम, सुरज शिंगे, मनजीत तिवले, सागर माने, राजकुमार खरात, सचिन किल्लेदार, महेश बोंद्रे, ओंकार माने, वैभव खवाटे, प्रमोद जाधव आदींनी सहभाग घेतला.
आंदोलकांच्या मागण्या
- ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा दरवर्षी एकच घ्या.
- एक राज्य एक खेळ एक संघटना ही संकल्पना शासनाने राबवावी.
- ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्या पैलवानास एक कोटीचे बक्षीस द्या.
- तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्यास पोलिस प्रमुखपदी थेट नियुक्ती द्या, एकवेळा ‘महाराष्ट्र केसरी’ असेल तर पीएसआय म्हणून नियुक्ती द्या.
- शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांच्यावरील बंदी हटवा.
- राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पैलवनांची डोपिंग टेस्ट करा.