माथेरानमधील विनापरवानगी खेळणी त्वरित बंद करा
By admin | Published: November 19, 2016 03:16 AM2016-11-19T03:16:03+5:302016-11-19T03:16:03+5:30
शिवाजी महाराज उद्यानात अल्ताफ हनिफ डांगे हे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी आकाशपाळणा व इतर खेळणी लावून व्यवसाय करीत आहेत
नेरळ : माथेरान येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात अल्ताफ हनिफ डांगे हे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी आकाशपाळणा व इतर खेळणी लावून व्यवसाय करीत आहेत; परंतु उद्यानात खेळणी लावण्याची मुदत ३० आॅक्टोबर रोजी संपली असतानादेखील या उद्यानात खेळणी लावून व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे या व्यावसायिकावर राजकीय वरदहस्त आल्याने हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप माथेरान नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ही विनापरवानगी खेळणी त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. माथेरानची विशेष आकर्षण असणारी मिनीट्रेन सध्या बंद असल्याने माथेरानच्या अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक हे माथेराला येऊन येथील उद्यानातील खेळांचा आनंद घेत असतात. माथेरानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात नगरपरिषदेच्यावतीने अनेक खेळणी लावण्यात आली आहेत. त्याच्याच शेजारी अल्ताफ या व्यावसायिकाने नगरपरिषदेच्या निविदेनुसार खेळणी लावून व्यवसाय करीत आहेत; परंतु या निविदेची मुदत संपून १० दिवस उलटले, तरी हा व्यवसाय सुरूच आहे. त्यामुळे या व्यवसायावर राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात असून पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे.
सध्या माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अनेक नेते प्रचारात गुंग असल्याचे दिसत आहे. निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरू झाली असताना निविदा काढता येत नाही. त्यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत शिवाजी महाराज उद्यानातील खेळणी व्यवसाय बंद करावा, अशी मागणी माथेरानमधील नागरिक राजेंद्र गंगाराम कदम आणि अकबर कासम मुजावर यांनी नगरपालिकेकडे ३ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे. या व्यावसायिकावर कारवाई न झाल्यास आम्हीही या उद्यानातील अन्य जागेवर खेळणी लावून व्यवसाय करू, असा इशारा राजेंद्र कदम आणि अकबर मुजावर या ग्रामस्थांनी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे दिला आहे. (वार्ताहर)