Coronavirus: मंत्रालयात सामान्यांना प्रवेश बंद; राज्य सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 02:13 PM2020-03-16T14:13:29+5:302020-03-16T14:22:18+5:30
सोमवारपर्यंत देशभरात 116 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर महराष्ट्रात हा आकडा 37 वर पोहचला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका जगाबरोबरच देशातही वाढला आहे. सोमवारपर्यंत देशभरात 116 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर महराष्ट्रात हा आकडा 37 वर पोहचला आहे. त्यामुळे मंत्रालयात सामन्यांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
विविध कामाच्या निमत्ताने राज्यभरातील लोकं मंत्रालयात येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता, राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना 31 मार्चपर्यंत मजाव करण्यात आला आहे. त्यामुळे मंत्री, अधिकारी आणि कर्मचार्यांनाच आता मंत्रालयात जाता येणार आहे.
राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन 4 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37वर गेली आहे. तर टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे 16, मुंबई 8, ठाणे 1, कल्याण 1, नवी मुंबई 2, पनवेल 1, नागपूर 4, अहमदनगर 1 , यवतमाळ 2, औरंगाबाद 1 अशी रुग्णांची संख्या आहे.