पाण्याअभावी बीएसएफ प्रशिक्षण केंद्र बंद
By admin | Published: December 25, 2015 03:49 AM2015-12-25T03:49:59+5:302015-12-25T03:49:59+5:30
पाणीटंचाईची झळ चक्क आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चाकूर स्थित सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्राला बसली आहे. पाण्याअभावी गेल्या पाच महिन्यांपासून हे केंद्र बंद आहे़
संदीप अंकलकोटे, चाकूर
पाणीटंचाईची झळ चक्क आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चाकूर स्थित सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्राला बसली आहे. पाण्याअभावी गेल्या पाच महिन्यांपासून हे केंद्र बंद आहे़ त्यामुळे सुमारे ५०० प्रशिक्षणार्थी जवानांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आॅगस्टमध्येच राजस्थानातील प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले़
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी ९ जानेवारी २००७ रोजी सीमा सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र हजारीबाग येथून चाकुरात आणले़
चाकूरच्या या केंद्रात दररोज
७५ हजार लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे़ या केंद्रास आनंदवाडी तलावातून पाणीपुरवठा होतो़ परंतु, पाऊस नसल्याने
तलाव कोरडा पडला. पाणी टंचाईवर मात घेतलेले आठ बोअर निकामी ठरले.
तहसीलदारांनी दोन बोअर अधिग्रहण करून दररोज चार टँकर पाणी या केंद्राला दिले. परंतु तेवढ्यावर प्रशिक्षणार्थी जवानांना पाणी पुरणे अशक्य झाले. प्रशिक्षण देणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनाही तात्पुरत्या स्वरुपात दुसरीकडे पाठविण्यात आले आहे़