"बंद खोलीवाला मुद्दा"! "...तर यात अडीच वर्ष येतात कुठे? जे केलं ते...; शिंदेंनाही विचारून बघा", राज यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:07 PM2024-11-11T22:07:31+5:302024-11-11T22:10:20+5:30
"ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, हा जर समजा तुमचा फॉर्म्यूला ठरलेला आहे, तर यात हे अडीच वर्ष येतात कुठे? असा सवाल करत, जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं." असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे."
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी '2019 च्या बंद खोलीवाल्या मुद्द्यावरून' उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. "व्यासपीठावर तुम्ही बसलेले असताना, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सांगितलं की, आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. तुमचे म्हणणे आहे की, चार भिंतींच्या आत आमचं अडीच वर्षांचं ठरलं होतं, मग तुम्ही आक्षेप का नाही घेतला? ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, हा जर समजा तुमचा फॉर्म्यूला ठरलेला आहे, तर यात हे अडीच वर्ष येतात कुठे? असा सवाल करत, जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं." असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
'त्या' खोलीच्या मुद्यावर राज ठाकरे टीव्ही९ सोबत बोलताना म्हणाले, "प्रश्न असा आहे की, व्यासपीठावर तुम्ही बसलेले असताना, नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. अमित शाह यांच्या सभेत तुम्ही बसलेले असताना, अमित शाह म्हणाले होते, आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. तुमचं म्हणणं आहे की, चार भिंतींच्या आत आमचं अडीच वर्षांचं ठरलं होतं. मग तुम्ही आक्षेप का नाही घेतला? का नाही बोललात तुम्ही की, हे अडीच वर्षांचं आपलं ठरलेलं आहे, त्याचं काय झालं? तुमच्या समोर पब्लिकली हे झालं ना?
...तर यात हे अडीच वर्ष येतात कुठे?
पुढे राज म्हणाले, "मी तुम्हाला 1989 पासूनची गोष्ट सांगतो, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात जे अंडरस्टँडिंग होतं, ते मी तुम्हाला सांगतो. ज्यांचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री? बरोबर आहे? 1995 ला शिवसेनेचे सर्वाधिक आमदार होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले. भाजपने केला का दावा? नाही. प्रश्न असा आहे की, तुमचं जे अंडरस्टँडिंग असेल की, ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. आता हा जर समजा तुमचा फॉर्म्यूला ठरलेला आहे, तर यात हे अडीच वर्ष येतात कुठे? त्याच्यानंतर तुम्ही सांगायचे की, आम्ही अडीच-अडीच वर्षांचं बोललो होतो आणि त्यांनी कमिटमेंट दिली होती. तुमच्या डोळ्यासमोर ते बोलत होते की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. अडीच वर्षच असतील, असे नाही बोलले. हे ज्यावेळी निकाल लागले त्याच्यानंतर त्याना हे सर्व सुचलंय."
तुमच्या बोलण्याचा एकंदरित अर्थ असा निघतो की उद्धव ठाकरे यांनी हे सर्व मुख्यमंत्री पदासाटी केलं? असे विचारले असता राज ठाकरे म्हणाले, "शंभर टक्के"!
जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं -
पुढे राज म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनाही विचारून बघा. ज्यावेळी काँग्रेसबरोबर ते जात होते, तेव्हा सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे यांना करायला सांगिल्या. जेणेकरून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, असं जवळपास त्यांना सांगितलं होतं. विचारून बघा त्यांना आणि नंतर स्वतः जाऊन बसले. जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठीच केलं."