घर बंद, तरीही तिथे कपडा पेटतो!

By admin | Published: November 6, 2014 03:56 AM2014-11-06T03:56:10+5:302014-11-06T03:56:10+5:30

घर बंद, तरीही घरात घाण येणे, अंगावरील तसेच घरातील कपड्यांनी पेट घेणे, घरातच फटाका फुटणे, अशा आपोआप घडणा-या घटनांनी टोकी या गावात खळबळ उडाली आहे

Closed the house, still there is a garment over there! | घर बंद, तरीही तिथे कपडा पेटतो!

घर बंद, तरीही तिथे कपडा पेटतो!

Next

विनोद जाधव, लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद)
घर बंद, तरीही घरात घाण येणे, अंगावरील तसेच घरातील कपड्यांनी पेट घेणे, घरातच फटाका फुटणे, अशा आपोआप घडणा-या घटनांनी टोकी या गावात खळबळ उडाली आहे. गावातील कोणाचाही भानामतीसारख्या अंधश्रद्धांवर विश्वास नाही. पण हा प्रकार कशामुळे घडतो, याचेही उत्तर कोणाकडे नाही.
नागपूर-मुंबई महामार्गावरील खोजेवाडी फाट्यापासून आत पाच किलो मीटर अंतरावर हे गाव आहे. वडगाव टोकी ही त्यांची ग्रुप ग्रामपंचायत. या गावातील रहिवासी सखाहारी शेजवळ हे आई, पत्नी, दोन मुलांसमवेत राहतात. वाळूज एमआयडीसी येथे ते काम करतात. सप्टेंबर महिन्यापासून हे कुटुंबीय या अचानक घडणाऱ्या घटनांनी त्रस्त झाले आहे.
आमच्या घरात दार बंद असताना घाण येऊन पडणे, मुलांच्या अंगावरील कपडे पेटणे, कोणीही समोर नसताना मोठ्या मुलाचा गळा दाबला जाणे, पोळीच्या टोपलीत कपडा येऊन त्यातील पोळ्या-भाकरी जळणे, घरातील वस्तू जागेवरून इतरत्र जाणे, अशा भयभीत करणाऱ्या घटना घडत असल्याचे शेजवळ यांनी सांगितले. या घटनांमुळे हे कुटुंब धास्तावले असून, रात्री सर्व कुटुंबीय घराबाहेर ओट्यावर झोपतात. सखाहारी यांच्या पत्नी निर्मला यांनी सांगितलेला प्रकार तर आणखी धक्कादायक. या ठिकाणी अनेक प्रकार होत असल्याने आम्ही एमआयडीसी येथे राहण्यास गेलो. त्या ठिकाणीही असेच घडत गेले. त्यामुळे आम्ही परत गावी आलो़ या प्रकारातून पोलिसांनी किंवा अंधश्रद्धा निर्मलून समितीने आमची सुटका करावी, अशी विनवणी त्यांनी केली.
गावच्या सरपंच मंजूषा दीपक करपे यांनीही या घटनेला दुजोरा दिला. विज्ञानयुगात अशा प्रकारावर विश्वास नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र शेजवळ कुटुंब ज्या त्रासातून जात आहे, त्यातून त्यांची लवकर मुक्तता करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता अंधश्रद्धा निर्मलून समितीकडे जाण्यास सांगितले, अशी माहिती पोलीस पाटील अंबादास भुसारे यांनी दिली.
शेजवळ यांचे नातेवाईक रावसाहेब चव्हाण, प्रकाश गायकवाड, शेजारी अवंतिकाबाई शेजवळ यांनीही या घटनांना दुजोरा दिला. या गावातील रहिवासी भाऊसाहेब मोतकर व कैलास मोतकर यांनी या घटनेचा छडा लवकर लागला पाहिजे, अशी मागणी केली.

Web Title: Closed the house, still there is a garment over there!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.