तीन महिने जंजिरा पर्यटकांसाठी बंद
By Admin | Published: June 16, 2015 10:36 PM2015-06-16T22:36:55+5:302015-06-16T22:36:55+5:30
साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेला ऐतिहासिक जंजिरा किल्ला वास्तुविशारदाचा अजोड नमुना पर्यटकांना भुरळ न घालेल तरच नवल.
मुरुड : साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेला ऐतिहासिक जंजिरा किल्ला वास्तुविशारदाचा अजोड नमुना पर्यटकांना भुरळ न घालेल तरच नवल. येथे हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात, मात्र आता १ जून ते ३१ आॅगस्ट या कालावधीत समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मेरी टाइम बोर्डाच्या आदेशानुसार किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे येथे येणाऱ्या उत्साही पर्यटकांमध्ये काहीशी नाराजी आहे.
मुरुडपासून पाच किमीवर असलेल्या दंडा राजपुरीच्या दक्षिणेस भर समुद्रात तब्बल २२ एकर जागेत २२ बुरुजांची तटबंदी असलेल्या मूक पहारेदाराने इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि मराठी सत्ताधीशांच्या स्वाऱ्या झेलल्या. परंतु दान पडले ते केवळ हवशी सुलतानच्या पक्षामध्ये. अखेरपर्यंत ते सिद्द्यांकडे राहिले. या रोमहर्षक इतिहासाचे हौशी तथा इतिहास अभ्यासक पर्यटकांना अप्रुप वाटते. जंजिऱ्याच्या उरावर शह देण्यासाठी बांधलेल्या पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला शिवशाहीची दुर्दम्य इच्छाशक्ती व सामर्थ्यशाली झुंजारवृत्तीची जणू साक्ष देतो. सूर्याेदय ते सूर्यास्तापर्यंत हा किल्ला भटकंतीसाठी खुला असतो. प्रदूषणरहित शिडाच्या होड्या जंजिरा जलवाहतूक संस्थेतर्फे तैनात असतात. प्रौढांना रु . २० तर १२ वर्षांच्या आतील मुुलांना १० रु. तिकीट शुल्क आकारण्यात येते. सुमारे १०० माणसांना पाच महिने खात्रीशीर रोजगाराचे साधन उपलब्ध होते. पाकिटातील खाद्यपदार्थ, शीतपेये, नारळपाणी विक्रेते चांगला धंदा करतात. (वार्ताहर)