सराफांचा पुन्हा तीन दिवस बंद
By admin | Published: April 23, 2016 03:49 AM2016-04-23T03:49:48+5:302016-04-23T03:49:48+5:30
अबकारी कर कायद्यातील जाचक अटींवर अद्याप तोडगा न निघाल्याने देशातील सराफांनी सोमवारपासून पुन्हा तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
पुणे : अबकारी कर कायद्यातील जाचक अटींवर अद्याप तोडगा न निघाल्याने देशातील सराफांनी सोमवारपासून पुन्हा तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने दिलेल्या प्रस्तावातील काही मुद्यांवर अद्याप चर्चा झालेली नाही. बुधवारपर्यंत त्यावर चर्चा होऊन तोडगा निघाला नाही तर पुढेही बंद सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय त्यादिवशी घेतला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे व आॅल इंडिया अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष अॅड. फत्तेचंद रांका यांनी दिली.
अबकारी कराविरोधात देशभरातील सराफांनी १ मार्चपासून जवळपास दीड महिने बेमुदत बंद पुकारला होता. त्यानंतर संघटनेतर्फे केंद्र सरकारला ३४ मागण्यांचा नवीन प्रस्ताव देण्यात आला. त्यानंतर बंद मागे घेऊन सरकाला २४ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली. मागील दहा दिवस केंद्र सरकार व सराफांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सुमारे ७० टक्के मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप काही मुद्यांवर तोडगा निघालेला नाही. यासंदर्भात शुक्रवारी दिल्लीमध्ये देशातील विविध सराफ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीमध्ये देशपातळीवर आॅल इंडिया अॅक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली. अॅड. फत्तेचंद रांका हे या कमिटीचे अध्यक्ष असणार आहेत.बैठकीत झालेल्या निर्णयाविषयी माहिती देताना अॅड. रांका म्हणाले, आम्ही एकुण ३४ मुद्दे त्यांच्यासमोर ठेवले होते. त्यातील ६० ते ७० टक्के मुद्यांवर सरकारने सहमती दर्शविली आहे. उर्वरीत मुद्द्यांवर तोडगा निघालेला नाही. तसेच सहमती झालेल्या मुद्यांचे रुपांतर कायद्यात होणे आवश्यक आहे. त्यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या तीन दिवसांत तोडगा न निघाल्यास पुढील बंंदची दिशा ठरविली जाईल. सोमवारी सराफांचा जंतरमंतरवर मोर्चा काढण्यात येणार आहे.