अतिक्रमणावरील कारवाईविरोधात आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2016 04:51 AM2016-07-18T04:51:27+5:302016-07-18T04:51:27+5:30
पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात सोमवारी नवी मुंबई बंदची घोषणा करण्यात आली आहे.
नवी मुंबई : पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात सोमवारी नवी मुंबई बंदची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कारवाईला पावसाळ्यापुरती स्थगिती दिल्यामुळे भाजपाने या बंदमधून माघार घेतली आहे, परंतु प्रकल्पग्रस्तांचा उत्साह पाहता, इतर पक्षीयांनी मात्र बंदला पाठिंबा दर्शवला आहे.
पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. प्रथमच मोठ्या स्वरूपात या कारवाया होत असून, पाडल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये गावठाणलगतच्या इमारतींचाही समावेश आहे. मात्र, शासन स्तरावर निर्णय प्रलंबित असल्याने, सन २०१३ पूर्वीच्या बांधकामांना कारवाईतून वगळण्यात येत आहे, परंतु पाडली जाणारी बांधकामे गरजेपोटीची असल्याचे सांगत, प्रकल्पग्रस्तांनी पालिकेच्या कारवाईला विरोध दर्शवला आहे. त्यांचा विरोध धुडकावून पालिकेची कारवाई सुरूच असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. त्यांच्या या आंदोलनाला काही व्यापारी प्रतिनिधींनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे. अशातच रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळ्यात बांधकामांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन आमदार मंदाताई म्हात्रे यांना दिले. त्यांच्या या आश्वासनानंतर भाजपाने बंदमधून माघार घेतली आहे, परंतु तुर्भे येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी सर्वपक्षीय नेत्यांना धारेवर धरत मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर अविश्वास दाखवत आमदार म्हात्रे यांनाही धारेवर धरले. यामुळे सभेतून त्यांना काढता पाय घ्यावा लागला. त्यानंतर, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपस्थित लोकप्रतिनिधींनी प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)
>तुर्भे येथे होणार बैठक
भाजपा वगळता इतर पक्षीयांनी निर्णयावर ठाम राहात सोमवारच्या बंदचा निर्णय कायम ठेवला आहे. बंददरम्यान सोमवारी सकाळी तुर्भेतील दत्तमंदिर येथे बैठक होणार असून, आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही खबरदारी घेत, आंदोलनाच्या दिवशी परिसरात चोख बंदोबस्ताची तयारी चालवली आहे.