अनधिकृत कॉल एक्स्चेंज चालविणाऱ्यांना कोठडी
By admin | Published: July 12, 2017 04:54 AM2017-07-12T04:54:36+5:302017-07-12T04:54:36+5:30
अनधिकृत आंतरराष्ट्रीय कॉल एक्स्चेंज चालवणाऱ्या सहा जणांना भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : अनधिकृत आंतरराष्ट्रीय कॉल एक्स्चेंज चालवणाऱ्या सहा जणांना भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या सर्वांची आधारवाडी तुरुंगात रवानगी झाली असून युनूस इम्तियाज अहमद आझमी याला चौकशीसाठी लातूरला नेण्यात आले आहे.
पोलिसांनी कारवाई केलेल्या कॉल एक्स्चेंजमध्ये आंतरराष्ट्रीय कॉल करण्यासाठी चीनमधून मागवलेल्या यंत्रात बसवलेल्या सिमकार्डद्वारे राऊट करून भारतातील मोबाइल नंबर किंवा लॅण्डलाइनला जोडले जात होते. त्यामुळे भारतातील मोबाइलवर परदेशातील नंबर न येता भारतातील कंपनीचे नंबर येत होते. त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेला अथवा डिपार्टमेंट आॅफ टेलिकम्युनिकेशनला ही माहिती मिळत नव्हती.
या कॉलचे बिल डॉलरमध्ये मिळत असल्याने ते शहरातील वेस्टर्न युनियन सेंटरमधून कॅश केले जात होते. हा सर्व व्यवहार कोड किंवा आयडीने होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र एकूण किती रुपयांचा व्यवहार झाला, याची माहिती पोलिसांना मिळाली नाही. तर डिपार्टमेंट आॅफ टेलिकम्युनिकेशनमार्फत याचा तांत्रिक खुलासा करण्यात आला नाही अथवा त्यांनी हे व्यवहार बंद करण्यासाठी कोणती पावले उचलली याबाबत माहिती पोलिसांना पुरवली नाही. त्यामुळे दोन महिन्यांपासून सुरू असलेला पोलीस तपास कारवाईपर्यंत पोहोचलेला नाही. अजूनही शहरात अथवा इतर ठिकाणी असे अनधिकृत कॉल एक्स्चेंज सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.