उत्पादन शुल्क वाढीविरोधात सराफांचा बंद
By Admin | Published: March 3, 2016 01:28 AM2016-03-03T01:28:47+5:302016-03-03T01:28:47+5:30
सोन्यावर एक टक्का उत्पादनशुल्क लादण्यात आल्याच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांनी मंगळवारी दुपारी तीनपासून बेमुदत बंद पुकारला आहे.
पिंपरी : सोन्यावर एक टक्का उत्पादनशुल्क लादण्यात आल्याच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांनी मंगळवारी दुपारी तीनपासून बेमुदत बंद पुकारला आहे. जोपर्यंत हे अन्यायकारक शुल्क रद्द करण्यात येत नाही, तोपर्यंत हा बंद मागे घ्यायचा नाही, असा निर्धार सराफ व्यावसायिकांनी केला आहे.
शहरातील सराफांनी मंगळवारी दुपारपासूनच दुकाने बंद ठेवली. पिंपरी-चिंचवड सराफ असोसिएशनतर्फे या संदर्भात बैठकही घेण्यात आली. जोपर्यंत हे शुल्क रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
शहरातील सराफांनी हिंजवडी, वाकड, सांगवी, खडकी, दापोडी, भोसरी, नेहरुनगर, पिंपरी, चिंचवडगाव, चिखली, निगडी या भागात रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून जी सराफ दुकाने सुरू आहेत, त्यांना दुकाने बंद करण्याची अािण आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली. पिंपरीतील शगुन चौकात या रॅलीची सांगता झाली. सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सोनिगरा, उपाध्यक्ष दिलीप सोनिगरा, खजिनदार विमल जैन, सेक्रेटरी मनीष सोनिगरा, तेजपाल रांका आदी उपस्थित होते.
दोन लाखांहून अधिक कि मतीचे दागिने खरेदीसाठी पॅनकार्डची सक्ती हा निर्णय सरकाने यापूर्वीच घेतला आहे. त्याबाबत व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या अर्थसंकल्पात हा नियम रद्द केला जाईल किंवा खरेदीची मर्यादा वाढविण्यात येईल, अशी व्यावसायिकांची अपेक्षा होती. परंतु, तशी कोणतीही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. याउलट एक टक्का उत्पादनशुल्क लादण्यात आले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट आहे. सर्व सराफ व्यावसायिकांनी या अन्यायकारक निर्णयाविरोधात निर्णायक लढा द्यायचे ठरवले आहे. पुढील रूपरेषा लवकरच निश्चित केली जाईल, असे सराफांनी सांगितले. अर्थमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सराफ असोसिएशनचे शिष्टमंडळ गेले आहे. या बैठकीत निर्णय झाल्यानंतर आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरेल, असे अध्यक्ष सोनिगरा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)