आलेमावना राष्ट्रवादीची दारे बंद
By admin | Published: December 25, 2015 03:45 AM2015-12-25T03:45:51+5:302015-12-25T03:45:51+5:30
गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चिल आलेमाव यांना प्रवेश देण्यास पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाखुशी व्यक्त केली आहे. पुणे येथे पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला
राजू नायक, पुणे
गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चिल आलेमाव यांना प्रवेश देण्यास पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाखुशी व्यक्त केली आहे. पुणे येथे पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’च्या संपादकांशी वार्तालाप केला. त्यात चर्चिल आलेमाव यांना पक्षात घेण्यास आपण स्वत:च अनुकूल नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा प्रकट केली आहे. त्यासाठी त्यांनी माझी भेट घेतली. मात्र, त्यांना पक्षात प्रवेश देण्याची माझी इच्छा नाही. त्यांचे नावही खराब आहे!, अशा शब्दांत पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आलेमाव यांना पुन्हा पक्षात घेण्यास काँग्रेसने असमर्थता दर्शवल्यानंतर त्यांनी इतर पक्षांचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनीच आलेमाव यांना राष्ट्रवादीची दिशा दाखवल्याची वदंता आहे. आलेमाव यांना दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी आणि नावेली मतदारसंघातून विधानसभेत पुनर्प्रवेश करण्याच्या आपल्या प्रयत्नांना त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी फालेरो यांचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर राजकीय विजनवासातून बाहेर येण्यासाठी मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी मिळवण्याचे चर्चिल यांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर आलेमाव यांनी गोव्यात कोणतेही स्थान नसलेल्या ‘तृणमूल काँग्रेस’मध्ये प्रवेश करून दक्षिण गोव्यातून उमेदवारी दाखल केली. आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसला अपशकुन करण्याचा हा डाव होता. आलेमाव यांनी आधीही त्यांच्या पक्षाला अडचणीत आणले असून त्यांचा हा पूर्वेतिहास माहीत असल्यानेच त्यांचा प्रवेश पवारांनी रोखला आहे.
काँग्रेसशी आघाडीत स्वारस्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील भवितव्य काय?, यावर ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी गोव्यातही अनेक वर्षे राहिली आणि त्यामुळे दोन्ही पक्षांना सत्ता उपभोगता आली. मात्र, अलीकडील काळात काँग्रेसने राष्ट्रवादीशी फटकून राहण्याचे धोरण अवलंबिले असून परिणामी दोन्ही पक्षांना सत्ता गमवावी लागली. काँग्रेसशी असलेली आघाडी राखण्यात राष्ट्रवादीला स्वारस्य असून तेच देशाच्या आणि गोव्याच्याही हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले.