गिरण्या बंद, रोजगाराची अन पोटाचीही भूक
By admin | Published: October 28, 2016 06:27 PM2016-10-28T18:27:23+5:302016-10-28T18:58:55+5:30
ऐतिहासिक कापड गिरण्या बंद पडल्या. धुराडी बंद झाली. विडी उद्योब संपले, मात्र बेकारीतही काही करण्याची जिद्द सोलापूरकरांची कुठेच विझलेली नव्हती़.
आप्पासाहेब पाटील/ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 28 - ऐतिहासिक कापड गिरण्या बंद पडल्या. धुराडी बंद झाली. विडी उद्योब संपले, मात्र बेकारीतही काही करण्याची जिद्द सोलापूरकरांची कुठेच विझलेली नव्हती़. प्रबळ स्वप्नांवर आशावादाच्या चुली पेटल्या. हाताला चटके सोसत धडधड चादरीची जागा कडकड भाकरीने घेतली आहे. काळाच्या ओघात गिरण्या बंद पडल्या तरी रोजगारासाठी येणारा लोंढा थांबला नाही़. पोटाची खळगीदेखील चुलीवरील भाकरीने भरली. चादरीचा रोजगार बंद झाला तरी भाकरीच्या व्यवसायाने हाताला रोजगारही मोठ्या प्रमााणात अन् भाकरीमुळेच बेरोजगारीवर मात करता आली.
प्रत्येक वस्तूचा दर्जा आणि करण्याची पद्धत न्यारी असल्यामुळे सोलापुरी कडक भाकरी व शेंगदाणा चटणीला आता हळूहळू खाद्यजीवनात विशेष असं स्थान निर्माण करीत आहेत. सोलापूर हा तसा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून दुष्काळामुळे अनेकांचे अर्थकारण बिघडले. मात्र दुष्काळामुळे न खचता दुष्काळाशी दोन हात करीत सोलापूरकरांनी विविध उद्योगनिर्मितीचे पर्याय उघडले. त्यापैकी काही टिकले तर काही कच्चा मालाअभावी बंदही पडले़ अशातच कमी खर्चात जास्तीचे उत्पादन देणाऱ्या कडक भाकरीने उद्योग क्षेत्रात चांगलाच जम बसविला. या भाकरी उद्योगनिर्मितीकरांनी सर्वप्रथम पर्यटकांना आकर्षित केले. त्यानुसार पर्यटन क्षेत्र जसेजसे विकसित होऊ लागले तसे तसे या कडक भाकरी उद्योगास अच्छे दिन येऊ लागले. त्यामुळे सोलापूरची भाकरी सोलापूरतच नव्हे तर आता देशातही सोलापूरचे नावलौकिक केले आहे. सोलापूरची ज्वारीची भाकरी(ज्वारी हे मुख्य पिक असल्यामुळे सोलापुरी ज्वारीलाही खास चव असते) आणि त्या बरोबर शेंगदाण्याची चटणी, बेसनाचे पिठले, वांग्याची भाजी अन दही, या झकास मेनू चा आस्वाद घेण्यासाठी बहुतांश पर्यटक सोलापूरमार्गे प्रवास करतात. एवढेच नव्हे तर सोलापूरला पर्यटनासाठी येणारा प्रत्येक पर्यटक हा कडक भाकरी, शेंगा चटणीचा आस्वाद घेतल्याशिवाय परतीचा रस्ताच धरत नाही एवढे मात्र विशेष.
---------------------------------
२५ हजार महिलांना मिळतो रोजगार
कडक भाकरी तयार करण्याच्या रोजगारात साधारणत शहर व ग्रामीण भागातील २५ हजार महिलांचा सहभाग आहे. यात ग्रामीण भागातील महिलांचा सहभाग १० टक्के आहे. १ नग कडक भाकरीपोटी महिलांना ५ रूपये मिळतात. १ महिला दिवसांपासून किमान १५० भाकऱ्या बनविते.
----------------------------------------
यामुळे झाले शक्य
सोलापूर जिल्हा हा तसा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो़ या जिल्ह्यातील मंगळवेढा येथील मालदंडी ज्वारी जगप्रसिध्द आहे. त्यामुळे कच्चा माल इथे मिळतो़ कडक उन्हाळा, पाण्याचा अंश कमी या भौगोलिक परिस्थितीमुळे येथील कडक भाकरीला चव चांगली आहे. कमी पाणी, ज्वारीचे पीठ चांगले व हाताने थापाटल्यामुळे या ज्वारीचे भाकरीचे आयुष्यमान साधारणत : ३ महिने एवढे आहे. सोलापूरची भाकरी किमान तीन महिने तरी चव बदलत नाही, बुरशी लागत नाही, खराब होत नाही़ शिवाय सोलापूर शेजारील असलेल्या कर्नाटकातील प्रमुख आहारात भाकरीचे स्थान महत्वाचे मानले जाते. त्यामुळे कडक भाकरीच्या उद्योगाला सोलापूरात चांगले वातावरण आहे.
--------------------------------
सातासमुद्रापार गेली कडक भाकरी
सोलापूरातील काही विद्यार्थी ही शिक्षणासाठी आॅस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, लंडन, रशिया, पाकिस्थान यासारख्या देशात गेली आहेत. ही मुले सहा महिन्यातून एकदा सोलापूरला येतात़ यावेळी जास्त दिवस टिकणारी व चविष्ट अशी भाकरी भारतातून जाताना घेऊन जातात. त्याठिकाणी गेल्यावर या भाकरीची चव परदेशातील इतर मित्रांनाही भावते त्यामुळे वर्षाला २५ लाखाहुन अधिक कडक भाकऱ्या या परदेशात जातात. या भाकरीची किंमत भारतात ५ रूपये असली तरी परदेशात हीच भाकरी ३० ते ४० रूपयांचा विकली जाते, अशी माहिती हर्षदा अनिरूध्द काटकर, अमृता निखिल मोजूम, अर्चना तोष्णीवाल, परिक्षित चव्हाण (जपान) या भारतीय युवक/ युवती ज्या परदेशात शिक्षण घेतात यांनी दिली़
--------------------------
बाजारपेठातही भाकरीची चलती
सोलापूरात कडक भाकरीने व्यवसायाचे रूप धारण केले़ आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात याच भाकरीने सोलापूर शहरातील डी मार्ट, रिलायन्स मार्ट यासारख्या घाऊक बाजारपेठांमधून सोलापूरची भाकरी विकली जाते़ येथीलच पेठे बंधू, उद्योगवर्धिनी, विडी कामगार व नसले बंधुनी भाकरीच्या व्यवसायातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे़ शिवाय रोजगारही वाढत आहे़
---------------------
कडक भाकरी ही सोलापूरची ओळख निर्माण होवू पाहत आहे़ परदेशातही या भाकरीला चांगली मागणी आहे़ पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या आवडीच्या या भाकरीने सोलापूरातील महिलांच्या रोजगारात अच्छे दिन आणले आहेत़ आणखीन प्रसिध्दी मिळाल्यास रोजगार वाढू शकेल़
- चंद्रिका चौहान
उद्योगवर्धिनी, सोलापूर