सोमवारपासून कपडा बाजार बंद ?
By admin | Published: October 16, 2016 03:16 AM2016-10-16T03:16:50+5:302016-10-16T03:16:50+5:30
दिवाळी तोंडावर असतांना मुंबईच्या कापड बाजारातली उलाढाल मात्र थंडावणार आहे. गुमास्ता कामगारांच्या मागण्यांबाबत मालकांच्या संयुक्त कृती समितीसोबत सकारात्मक
मुंबई : दिवाळी तोंडावर असतांना मुंबईच्या कापड बाजारातली उलाढाल मात्र थंडावणार आहे. गुमास्ता कामगारांच्या मागण्यांबाबत मालकांच्या संयुक्त कृती समितीसोबत सकारात्मक चर्चा न झाल्याने मुंबई गुमास्ता युनियनने सोमवारपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे.
सणासुदीच्या दिवसात कापड बाजारात काम करणाऱ्या गुमास्ता कामगारांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी शुक्रवारसह शनिवारी बंद पुकारला होता. जर या दोन दिवसांत मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर बेमुदत संपाचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला होता. त्यानुसार संयुक्त कृती समितीने कामगारांच्या कामगारांच्या मागण्यांबाबत कोणतीही चर्चा केली नसल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून कामगारांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. या कामगारांना पगारवाढीसोबतच आरोग्य वीमा कवचही मिळायला हवे ही मागणी गुमास्ता कामगार संघटनेने केली आहे. दरम्यान, गतवर्षी याच मागणीसाठी संप पुकारण्यात आला होता. तेव्हा त्यांना पंधरा हजार एकरकमी लाभवेतन देण्यात आले होते. मात्र यंदा कोणताही निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाही.
मंगलदास मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, जुनी हनुमान गल्ली या कापड बाजारातील वीस ते पंचवीस हजार गुमास्ता कामगार या संपात सहभागी झाले आहे. सकाळी दुकान उघडण्यापासून ग्राहकांना मनपसंत कपडे दाखवणे, विस्कटलेल्या कपड्यांची घडी घालणे, नेहमीच्या गाहकांकडून पैशांची वसुली करणे, अशी विविध कामे गुमास्ता करतात. परिणामी गुमास्ता कामगारांनी बेमुदत संपाची हाक दिल्यामुळे ही सर्व कामे एकटया मालकाला करणे शक्य नाही. त्यामुळे संपानंतर आपोआपच बाजार बंद पडण्याची शक्यता आहे.
शर्टपीस, पँटपीस, साडया आणि कपड्यांचे विविध प्रकार याठिकाणी स्वस्त दरात मिळतात. त्यामुळे मुंबईसह बाहेरील शहरांतील नागरिकही याठिकाणी खरेदीसाठी येतात. दिवाळीमध्ये येथे कोटयवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र गुमास्ता कामगारांच्या संपामुळे दिवाळीच्या तोंडावर पूर्ण बाजारपेठ ठप्प पडणार असून शासनाचा कोटयवधींचा महसूलही बुडणार आहे.