‘वस्त्रहरण’ थांबले!

By admin | Published: February 20, 2017 04:47 AM2017-02-20T04:47:03+5:302017-02-20T04:47:03+5:30

मुंबईसह १० महापालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचाराच्या नावाखाली राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये

'Clothing' stopped! | ‘वस्त्रहरण’ थांबले!

‘वस्त्रहरण’ थांबले!

Next

गौरीशंकर घाळे / मुंबई
मुंबईसह १० महापालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचाराच्या नावाखाली राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये सुरू असलेला ‘वस्त्रहरणा’चा खेळ अखेर रविवारी थांबला. आदर्श आचारसंहितेनुसार जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्याने एकमेकांवर यथेच्छ टीका करणारे पुढारी आता अखेरच्या टप्प्यातील ‘जुळवाजुळव’ करण्यात गुंतले आहेत.
स्थानिक स्वराज संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यातील या निवडणुकांसाठी २१ फ्रेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. नियमाप्रमाणे महापालिका निवडणुकांचा प्रचार हा मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी बंद होतो. त्यानुसार रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता सर्व १० महापालिकांतील प्रचार मोहिमा थांबल्या. तर, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार २४ तास आधी म्हणजे रविवारी रात्री बारा वाजता थांबला. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला. राज्य आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेने युतीचा काडीमोड करत स्वबळावर मुंबई महापालिका काबीज करण्याचा चंग बांधत प्रचार मोहीम आखली. युती फिस्कटल्यानंतर मात्र दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका केली. दोन्ही बाजूने एकमेकांवर होणाऱ्या या टीकेने अत्यंत खालची पातळी गाठली. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाक्युद्धाने दोन्ही पक्षांतील विखार टोकाला गेला.
याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राजकीय दंगलीत आपले डाव टाकले. रविवारी उमेदवारांनी काढलेल्या प्रचारफेरींनी प्रचाराची सांगता झाली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकहाती भाजपाच्या प्रचाराची
धुरा सांभाळली. एकट्या मुंबईत त्यांनी बारा सभा घेतल्या. त्याशिवाय नाशिक, पुणे, पिंपरी चिंवड, सोलापूरसह राज्यभर प्रचारसभांचा धडाका उडवला. मुख्यमंत्र्यांच्या जोडीला मुंबईत केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी, व्यंकय्या नायडू, पुरुषोत्तम रुपाला, खासदार योगी आदित्यनाथ, मनोज तिवारी यांच्यासह राज्यातील बहुतांश मंत्री मैदानात उतरले होते.
शिवसेनेचा संपूर्ण प्रचार मुंबईभोवती एकवटला होता. उद्धव ठाकरे यांनी तब्बल २५ जाहीर सभांना संबोधित केले. त्यांच्या जोडीला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभा व रोड शोही झाले.
काँग्रेसने मात्र त्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपविली. अखेरच्या टप्प्यातील प्रचारासाठी दिग्विजय सिंग, ज्योतिरादित्य शिंदे, रणदीप सुरजेवाला, अभिनेत्री नगमा आणि खुशबू मुंबईत दाखल झाल्या. याशिवाय प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यभर सभा घेतल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचा प्रचार सांभाळला. शरद पवार यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रचाराच्या रणधुमाळीत प्रथमच शरद पवारांनी खालच्या पातळीवरील टीका केल्याचाही आरोप झाला.

कोण काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस
छत्रपतींचे नाव घेऊन खंडणी वसूल करणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.
च्सेनेने २० वर्षांत मुंबईचे रुपांतर पाटण्यात केले.
च्शिवसेनेला सुटी देण्याची हीच वेळ
च्नोटबंदीमुळे उद्धव ठाकरेंचे किती पैसे बुडाले?
च्महापालिकेतील भ्रष्टाचाराचा कोथळा काढणारच
च्माझ्या अंगावर याल, तर तुमचे कपडे उतरवू

उद्धव ठाकरे
सेना संपवू म्हणणाऱ्यांना कायमचे हद्दपार करू
हुतात्मा चौकात भाजपावाले
अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का?
वाघाच्या वाट्याला जाऊ नका
मंत्रालयाचे ‘गुंडालय’ होत आहे.
नागपूर महापालिकेत काय दिवे लावले?
भाजपाच्या व्यासपीठावर पूर्वी
शंकराचार्य होते, आता गुंडाचार्य दिसतात
प्रथमच इतका फोल मुख्यमंत्री मिळाला

शरद पवार
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची
सुसंस्कृत परंपरा मोडली.
फडणवीस खालच्या
पातळीवर उतरले
शिवसेनेत हिंमत असेल,
तर सरकारमधून बाहेर पडावे
सरकार पडले, तर आम्ही
कोणालाही पाठिंबा देणार नाही.

अशोक चव्हाण
भाजपा-शिवसेनेची ही
लढाई लुटुपुटुची
भाजप सरकारमुळे
शेतकरी देशोधडीला
नोटाबंदीमुळे अनेकांच्या
नोकऱ्यांवर गदा
भाजपाने काँग्रेसच्या काळातील प्रकल्पांचे श्रेय लाटले

राज ठाकरे : भाजपाची पावले हुकूमशाहीच्या दिशेने पडू लागली आहेत. आधी विदर्भ आणि नंतर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांचा महापालिकेतील पैशावर डोळा आहे.
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मैदानात उतरलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांवर दुगाण्या झाडल्या. केवळ सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष कोंबड्यांसारखे झुंजत आहेत यांच्या भांडणाशी जनतेचा काही संबंध नाही, असे सांगत राज यांनी सभा गाजविल्या. राज यांनी प्रथमच प्रचारसभांमध्ये विकासकामांचे सादरीकरण करण्याचा पायंडा पाडला.

Web Title: 'Clothing' stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.