किरणोत्सवाला ढगांचा अडथळा
By Admin | Published: February 2, 2016 04:06 AM2016-02-02T04:06:02+5:302016-02-02T04:06:02+5:30
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा दुसऱ्या दिवशीचा किरणोत्सव सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे होऊ न शकल्याने भाविकांची निराशा झाली.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा दुसऱ्या दिवशीचा किरणोत्सव सोमवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे होऊ न शकल्याने भाविकांची निराशा झाली. पहिल्या दिवशी (रविवारी) सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हीच सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती, पण सूर्यकिरणे साडेपाच वाजेपर्यंत मंदिराच्या पश्चिमद्वार महाद्वाराला स्पर्श करून गायब झाली. मंगळवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस आहे.
सोमवारी किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये बाहेरगावांहून आलेल्या भाविकांची संख्या मोठी होती. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या किरणोत्सवात महाद्वार रोड ते रंकाळा टॉवर या रस्त्यावरील इमारती, मोबाइल टॉवर, जाहिराती फलक यांचा अडथळा येत होता. हे किरणोत्सवातील अडथळे दूर करण्याबाबत कोल्हापूर महापालिकेला कळविले होते. त्यामुळे यातील काही अडथळे हटवण्यात आले होते. त्यामुळे रविवारी पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी मंदिरात प्रवेश करत थेट अंबाबाई देवीच्या मूर्तीला चरणस्पर्श केला.
किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर ढगाळ वातावरण राहिले. तरीही साडेपाच वाजता मंदिराच्या पश्चिमद्वारापर्यंत सूर्यकिरणे पोहोचली. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे किरणातील घनताचे प्रमाण कमी असल्याने किरणोत्सव झाला नाही.
ही सूर्यकिरणे सायंकाळी ६.१० वाजता देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता होती, अशी माहिती प्रा. डॉ. एम.एम. कारंजकर यांनी दिली. या वेळी केआयटी कॉलेजचे प्रा. किशोर हिरासकर, चंद्रकांत परुळेकर यांच्यासह केआयटीचे विद्यार्थी, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)