मालवणात ढगफुटी, ओढे-नद्यांना पूर, वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 06:25 AM2018-06-22T06:25:06+5:302018-06-22T06:25:36+5:30
कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेला मान्सून गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही धो-धो बरसला. मालवणमध्ये तर ढगफुटी झाली.
सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेला मान्सून गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही धो-धो बरसला. मालवणमध्ये तर ढगफुटी झाली. तिथे ३५० मि.मी. पावसाची नोंद झाली. अनेक घरांमध्ये पाणी घुसून, लोकांचे संसार पाण्याखाली गेले. अनेक झाडेही उन्मळून पडली.
ओढे-नद्यांना पूर आल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. देवली येथे डोंगर खचल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाड्यात वीज पडून ८ ठार झाले आहेत. याशिवाय नगर आणि सोलापुरात प्रत्येकी एक जण दगावला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाचे पाण्याचे लोट अनेकांच्या घरात घुसले. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील गाबीतवाडा येथे ९ घरांमध्ये पाणी शिरून घरातील भांडी वाहून गेली. कोचरा-निवती येथे घराला पुराच्या पाण्याने वेढल्याने ९ जण अडकले होते. प्रशासनाने स्थानिक मच्छीमारांच्या साह्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले.
मालवण तालुक्यातील खालची देवली येथील कुलस्वामिनी मंदिरानजीक डोंगर खचला. यात डोंगराची माती देवली मार्गावरील रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. एका भंगार व्यावसायिकांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून घर जमीनदोस्त झाले. यात चार जण जखमी झाले. रायगड व रत्नागिरीमध्ये मात्र तुलनेने कमी पाऊस झाला. देवगड तालुक्यातील हुर्शी गडदेवाडीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने पडेल हायस्कूलमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करीत घर गाठावे लागले.
>पेण तालुक्यात भोगावती नदीचे पाणी अचानक वाढल्याने गणेश वास्कर, अनिकेत वास्कर व यशवंत अवास्कर हे तिघे वाहून गेले.
>कोकण, गोव्यातील गुहागर, पणजी, रत्नागिरी १५०, मार्मागोवा, मोरगाव ११०, कणकवली, मडगाव ९०, खेड ८०, फोंडा ७०, संगमेश्वर, देवरुख, वाल्पोई ६०, चिपळूण ५० मि.मी. पाऊस.
मध्य महाराष्ट्रात राधानगरी ५०, अमळनेर, जावळी माथा, खटाव, वडूज, नंदूरबार, ओझर, तळोदा ३०, बारामती, कोल्हापूर २० मि.मी. पाऊस.
मराठवाड्यात सेलू ५०, अहमदपूर, आष्टी ४०, मानवत, परळी वैजनाथ ३०, अंबड, भूम, जिंतूर, नायगांव, खैरगांव, पालम २० मि.मी पाऊस पडला़
विदर्भात मूर्तिजापूर ९०, अमरावती ७०, बार्शी टाकळी ६०, अकोला ५०, अंजनगाव, चिखलदरा, दिनापूर, कारंजा लाड, मंगरुळपीर, परतवाडा, पुसद, रामटेक ३० मि.मी. पाऊस झाला.
>मराठवाड्यात वीज पडून ८ ठार
उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस जोरदार पाऊस झाला. चार ठिकाणी वीज पडून ८ जणांचा मृत्यू झाला. एकट्या नांदेड जिल्ह्यात चौघे दगावले आहेत. लातूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील धालवडी (ता. कर्जत) येथील शेतकºयाच्या जागीच मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात हुलगेवाडी (ता. करमाळा) येथे एक जण ठार झाला. बुलडाणा जिल्ह्यातील माटरगाव बुद्रूक (ता. खामगाव) येथे वीज पडून झालाखाली उभे राहिलेल्या बाप-लेकीचा मृत्यू झाला.
>पुरात युवती वाहून गेली
खान्देशातही जोरदार पाऊस झाला. बोदवड तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरात चार बैलगाड्या उलटल्या. त्यात एक १६ वर्षीय युवती वाहून गेली.
>मान्सून सक्रिय होणार : हिंदी महासागर
व परिसरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असून, २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याचा आशादायक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ दक्षिण महाराष्ट्र ते केरळ दरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत आहे. कोकणात मालवण ३५०, वेंगुर्ला ३२०, राजापूर २६०, मापुसा २२०, देवगड १९० व कुडाळ, पेडणे, सावंतवाडी येथे १७० मिमी पावसाची नोंदी झाली आहे.