वळवाच्या पावसाचे ढग
By admin | Published: May 8, 2017 03:58 AM2017-05-08T03:58:39+5:302017-05-08T03:58:39+5:30
मध्य प्रदेशापासून कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पुढील पाच दिवसांत राज्यात वळवाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य प्रदेशापासून कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पुढील पाच दिवसांत राज्यात वळवाचा पाऊस होऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. रविवारी नगरसह सातारा, फलटण तालुक्यांत मान्सूनपूर्व पाऊस झाला.
विशेषत: कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह कोकणालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा, पारनेर व नेवासा तालुक्यात रविवारी दुपारनंतर, वादळी वाऱ्यासह झालेल्या वळवाच्या पावसाने आंबा, डाळिंब बागांचे नुकसान झाले. पारनेर, संगमनेर तालुक्यात गारांसह पाऊस झाला. साताऱ्यासह खंडाळा, फलटण तालुक्यांत रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारा पडल्या.
येथे बरसणार?
८ व ९ मे : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी
११ व १२ मे : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी
उकाड्याने हैराण
ढगाळ वातावरणामुळे निर्माण झालेल्या उकड्याने राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत.
वीज पडून महिला ठार
वैजापूर/गंगापूर (जि. औरंगाबाद) : वैैजापूर व गंगापूर तालुक्यातील काही भागाला रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. महालगाव येथे शेतात काम करताना अंगावर वीज कोसळल्याने मीराबाई नागनाथ गंडे (२५) हिचा मृत्यू झाला तर छाया सुभाष मोकाटे (४२) ही महिला गंभीर जखमी झाली. मीराबाई हिच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.