मुंबई ढगाळ, राज्याला पावसाचा इशारा
By admin | Published: March 14, 2017 07:39 AM2017-03-14T07:39:53+5:302017-03-14T07:39:53+5:30
राज्यात होत असलेल्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर १४ आणि १५ मार्च रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
मुंबई : राज्यात होत असलेल्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर १४ आणि १५ मार्च रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विशेषत: १५ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी वावटळ येईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तर मुंबई ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदवण्यात आल्यानंतर आता मात्र ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. काही ठिकाणी तापमान स्थिर असून, हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकणात कमाल तापमानात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात घट झाली आहे. विदर्भात कमाल तापमानात घट झाली आहे. मराठवाड्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण आणि विदर्भाच्या किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. तर गतआठवड्याच्या तुलनेत आता मुंबईच्या कमाल तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. ३४ अंशावर पोहोचलेले कमाल तापमान ३० अंशावर घसरले आहे. (प्रतिनिधी)