मुंबई ढगाळ; राज्यात धुळीच्या वादळासह उष्णतेची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 06:54 AM2019-05-10T06:54:12+5:302019-05-10T06:54:34+5:30
विदर्भातल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच देशातही फारशी परिस्थिती वेगळी नसल्याचे चित्र आहे. हवामानातील बदलामुळे ही स्थित्यंतरे नोंदविण्यात येत असून, राज्यासह अवघ्या देशात धुळीचे वादळ, उष्णतेची लाट आणि हलक्या पावसाने कहर केला आहे.
मुंबई : विदर्भातल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच देशातही फारशी परिस्थिती वेगळी नसल्याचे चित्र आहे. हवामानातील बदलामुळे ही स्थित्यंतरे नोंदविण्यात येत असून, राज्यासह अवघ्या देशात धुळीचे वादळ, उष्णतेची लाट आणि हलक्या पावसाने कहर केला आहे. उत्तर भारताचा विचार करता येथील काही राज्ये उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहेत. २४ तासांसाठी हीच परिस्थिती कायम राहणार आहे. मुंबईचा विचार केल्यास मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश ढगाळ राहील.
मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सियसवर स्थिर आहे. गुरुवारीही मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश नोंदविण्यात आले आहे. मागील आठवड्याभर मुंबई व आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. प्रत्यक्षात मात्र सकाळी अकराच्या सुमारास किंचित दाटून येणारे मळभ वगळता मुंबईकरांचा उन्हाचे चटकेच सहन करावे लागत आहेत. कडक उन आणि घाम फोडणारा उकाडा मुंबईकरांना तापदायक ठरत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
स्कायमेटच्या माहितीनुसार, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगढसह विदर्भात उष्णतेच्या लाट कायम आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशात हलक्या पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, कर्नाटक, केरळच्या काही भागात हलक्या पावसाची नोंद झाली आहे.
कर्नाटक, केरळमध्ये पावसाची शक्यता
स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाममध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. तामिळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये पावसाची शक्यता आहे. राजस्थान, पंजाब आणि हरियाणात धुळीचे वादळ उठण्याची शक्यता आहे. विदर्भ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणात उष्णतेची लाट कायम राहील.
मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस
१० मे : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल; तर काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येईल.
११ मे : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल. मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
१२ मे : मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
१० आणि ११ मे रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २५ अंशांच्या आसपास राहील.