कल्याण, मीरा-भार्इंदरमध्येही आता क्लस्टर डेव्हलपमेंट
By Admin | Published: June 12, 2014 04:30 AM2014-06-12T04:30:58+5:302014-06-12T04:30:58+5:30
मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली तसेच मीरा-भार्इंदर महापालिकेतही क्लस्टर पद्धतीने गृहनिर्माण योजना राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
मुंबई : मुंबई आणि ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली तसेच मीरा-भार्इंदर महापालिकेतही क्लस्टर पद्धतीने गृहनिर्माण योजना राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईनंतर ठाणे, नवी मुंबई आणि सिडकोच्या क्षेत्रात क्लस्टर पद्धतीने गृहनिर्माण योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हीच पद्धत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही राबवावी, अशी मागणी संजय दत्त यांनी केली. भाई जगताप यांनी या मागणीला पाठिंबा देताना संपूर्ण एमएमआरडीएच्या क्षेत्रातच ही पद्धत राबविण्याची मागणी केली.
त्याला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी सांगितले, की ठाणे, नवी मुंबई व सिडकोमध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे तेथे राबविण्यात येत असलेल्या क्लस्टर पद्धतीची यशस्विता पाहून कल्याण-डोंबिवलीमध्ये ही पद्धत राबविण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
त्यावर संजय दत्त यांनी कल्याण-डोंबिवलीबाबत सापत्नभाव का, असा सवाल केला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तरात हस्तक्षेप केला. मुंबईत बहुतांश इमारती अधिकृत आहेत. जुन्या, धोकादायक पण अधिकृत इमारतींबाबत क्लस्टर योजना वेगळी आहे. ठाण्यात बहुसंख्य इमारती अनधिकृत आहेत. त्यामुळे तेथे क्लस्टर पद्धत राबविण्यासाठी वेगळे मापदंड आहेत.
नवी मुंबई, ठाणे आणि सिडकोमध्ये क्लस्टर पद्धत राबविण्याच्या धोरणाबाबत लोकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. येत्या १७ जूनपर्यंत त्या येणार आहेत. त्यानंतर अंतिम अधिसूचना जारी होईल. साधारण १५ दिवसांचा वेळ यास लागेल. त्यानंतर कल्याण-डोंबिवली तसेच मीरा-भार्इंदर महापालिकांबाबत नक्कीच विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)