खात्यांतर्गत फौजदारांच्या नियुक्त्यांमध्ये गोंधळ

By admin | Published: February 17, 2015 01:33 AM2015-02-17T01:33:16+5:302015-02-17T01:33:16+5:30

सन २०००च्या कालबाह्य परिपत्रकानुसार नियुक्त्या केल्या जात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.

Clutter in the appointments of the army under the department | खात्यांतर्गत फौजदारांच्या नियुक्त्यांमध्ये गोंधळ

खात्यांतर्गत फौजदारांच्या नियुक्त्यांमध्ये गोंधळ

Next

यवतमाळ : महाराष्ट्र पोलीस दलातील खात्यांतर्गत फौजदारांच्या नियुक्त्यांबाबत संभ्रम आणि गोंधळाची स्थिती दिसून येत आहे. सन २०००च्या कालबाह्य परिपत्रकानुसार नियुक्त्या केल्या जात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.
राज्य पोलीस दलात फौजदारांच्या खात्यांतर्गत परीक्षेद्वारे जागा भरल्या गेल्या. मात्र त्यात नियुक्त्या देताना गुणवत्तेला मूठमाती दिली गेली. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना केवळ सेवाज्येष्ठता नाही म्हणून डावलले गेले तर दुसरीकडे अनुत्तीर्ण उमेदवारांना नियमबाह्यरीत्या ग्रेस देऊन उत्तीर्ण दाखवीत नियुक्त्या दिल्या गेल्या.
या नियुक्त्यांसाठी कालबाह्य परिपत्रकाचा आधार घेतल्याचा उत्तीर्ण, परंतु फौजदार नियुक्तीपासून वंचित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सूर आहे. सन २०००मध्ये शिपाई हा किमान फौजदार व्हावा आणि फौजदार हा अपर अधीक्षकापर्यंत बढतीने जावा, अशी तरतूद करणारे परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यासाठी २ हजार २४२ मूळ पदेही गोठविण्यात आली होती. वास्तविक हे परिपत्रक केव्हाच कालबाह्य झाले. मात्र त्यानंतरही या परिपत्रकानुसारच खात्यांतर्गत फौजदारांना नियुक्त्या दिल्या जातात.
एकीकडे सेवानिवृत्तीवर आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना फौजदार म्हणून नियुक्ती देण्यास तरुण पोलिसांचा विरोध आहे. अनुत्तीर्ण, वरपास झालेल्यांना नियुक्ती कशासाठी, असा त्यांचा सवाल आहे. सेवाज्येष्ठतेच्या निकषामुळे उत्तीर्ण झालेल्यांवर अन्याय होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. तर दुसरीकडे शासनाच्या नियमानुसार आम्हा निवृत्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मान म्हणून फौजदारपदी नियुक्ती देण्यात यावी, असा सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे.
फौजदारांच्या या नियुक्त्यांवरून पोलीस दलातच गुणवत्ताप्राप्त आणि सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचारी असे दोन गट पडल्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत. (प्रतिनिधी)

उच्च न्यायालयाचे निर्देश
खात्यांतर्गत फौजदारांच्या नियुक्त्यांच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात तीन ते चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर ५ फेब्रुवारी रोजी एकत्र सुनावणीअंती निर्णय देताना न्यायालयाने नियम आणि उपनियमांद्वारे निर्णय घेण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
३ महिन्यांच्या नियुक्त्याही रखडल्या
राज्यात फौजदार परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांपैकी १८०० कर्मचाऱ्यांना नियुक्त्या दिल्या गेल्या होत्या. त्यातील कित्येक जण सेवानिवृत्त झाले. मात्र या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. परीक्षा उत्तीर्ण पोलीस कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांसाठी नियुक्त्या दिल्या गेल्या होत्या. नंतर त्यांना पूर्ववत ठेवण्यात आले. जिल्ह्याबाहेर ९० दिवसांसाठी नियुक्तीचाही प्रस्ताव होता. त्यासाठी याद्या मागितल्या गेल्या. मात्र एक ते दीड वर्षापासून या याद्या प्रलंबित आहेत.

Web Title: Clutter in the appointments of the army under the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.