पेट्रोल-डिझेल खरेदीवर ‘लकी ड्रॉ’ बारगळल्याने गोंधळ
By Admin | Published: February 10, 2017 11:17 PM2017-02-10T23:17:45+5:302017-02-11T00:00:03+5:30
इंडियन आॅईल कंपनीच्या वतीने आयोजित प्रोत्साहनपर लकी ड्रॉ कूपनची सोडत शुक्रवारी बारगळल्याने संत एकनाथ रंगमंदिर परिसरात नागरिकांनी कंपनीच्या विरोधात
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 10 - इंडियन आॅईल कंपनीच्या वतीने आयोजित प्रोत्साहनपर लकी ड्रॉ कूपनची सोडत शुक्रवारी बारगळल्याने संत एकनाथ रंगमंदिर परिसरात नागरिकांनी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कंपनीच्या विक्री अधिकारी महिलेला नागरिकांनी व महिलांनी घेराव घातल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
२६ आॅक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत ५०० रुपये १००० रुपयांचे पेट्रोल- डिझेल खरेदीवर लकी ड्रॉ कूपन ठेवण्यात आले होते. या योजनेला जिल्हाभरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. परंतु १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४, ५, ८ अशा तीन टप्प्यात सोडत संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित केली होती. असे त्या कूपनवरच स्पष्ट लिहिलेले असल्याने नागरिकांनी दरम्यानच्या काळात खरेदी केलेल्या पेट्रोलवरील कूपन सांभाळून ठेवले आहेत. रिक्षाचालकांपासून ते स्कूटीस्वारांनीही ५ ते २० कूपन घेऊन नशीब अजमावण्यासाठी उस्मानपुरा येथील रंगमंदिरासमोर सायंकाळी ४ वाजेपासून येऊन बसले. रात्री ८ वाजेपर्यंत याठिकाणी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी किंवा पंपचालकाचे कुणीदेखील फिरकले नाही. सोडत पुढे ढकलण्यात आली अशी शहरातील एकाही पंपावर सूचना लावली नाही. कूपनवर प्रत्येकाचा फोन नंबर, नावाचा उल्लेख असताना त्यावरदेखील संदेश पाठविले नाही. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि एकच गोंधळ सुरू झाला.
अंधारात का ठेवले...
पेट्रोल कंपनीने सामान्य ग्राहकांची फसवणूक केली असून, नागरिकांना बक्षिसांचे प्रलोभन दाखविल्याने पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत नागरिकांनी घोषणाबाजी सुरू केली. येथे दूध विक्रेता, चालक, दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षाचालक स्वप्न मनाशी बाळगून होते. आपल्याला बक्षीस लागेल या त्यांच्या स्वप्नावर शुक्रवारी पाणी फेरले.
सोडत १० फेब्रुवारी रोजी ठेवली होती. काही तांत्रिक बाबीमुळे ती होऊ शकली नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती करून इंडियन आॅईल कंपनीच्या औरंगाबाद विभागाच्या विक्री अधिकारी महिलेला नागरिकांनी घेराव घातला होता.
आमचे प्रवास भाडे कोण देणार...
शुक्रवारी सोडत आहे, असे कूपनवरच जाहीर असताना जनतेच्या भावनाशी खेळणे चांगले नाही. जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, गंगापूर तसेच कूपन घेतलेल्या शेकडो नागरिकांनी प्रवास भाडे कोण देणार, असा जाब विचारणे सुरू करून अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. जनार्दन पवार, रमेश पोकलवार, फतरू शहा, विजय राजाळे, पवन कांबळे, स्नेहल त्रिभुवन, अण्णा म्हस्के पाटील आदींसह शेकडो नागरिकांनी जाब विचारला. अधिकारी महिलेसोबत लहान मूल असल्याने अखेर जनतेनेही काढता पाय घेतला. परंतु एक जमाव पोलीस ठाण्याकडे निघाला, रात्री उशिरापर्यंत क्रांतीचौक व उस्मानपुरा पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
कोटा पूर्ण न झाल्याने १० मार्चला सोडत...
१०० रुपयांपासून ते ५०० रुपये व १००० रुपयांच्या खरेदी कूपनचा कोटा पूर्ण न झाल्याने कंपनीने आयोजित सोडत १० फेब्रुवारीला होऊ शकली नाही. तांत्रिक बाबीमुळे सूचना देण्याचेदेखील राहून गेले. मार्चला ही सोडत ठेवण्यात आली आहे, असे इंडियन आॅईलच्या औरंगाबाद विभागाच्या विक्री अधिकारी अपेक्षा भदोरिया यांनी सांगितले.