"देवेंद्रजी, एक गोष्ट लक्षात ठेवा... राज ठाकरेंनी शिवसेना 'सोडली', पण 'तोडली' नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 06:45 PM2022-07-15T18:45:31+5:302022-07-15T18:46:17+5:30

Clyde Crasto : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

clyde crasto criticizes devendra fadnavis on raj thackeray meets | "देवेंद्रजी, एक गोष्ट लक्षात ठेवा... राज ठाकरेंनी शिवसेना 'सोडली', पण 'तोडली' नाही"

"देवेंद्रजी, एक गोष्ट लक्षात ठेवा... राज ठाकरेंनी शिवसेना 'सोडली', पण 'तोडली' नाही"

Next

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा आल्यानंतर भाजप-मनसेची जवळीक वाढत असल्याचे म्हटले जाते. त्यात आता राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. भाजपा-मनसे यांच्यात हिंदुत्वावरून एकमत झाले आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यातील मंत्रिमंडळात मनसेचाही समावेश असणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट केले आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी कितीही साकडे घातले तरी, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी,
राज ठाकरे यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना 'सोडली', पण 'तोडली' नाही आणि भविष्यातही ते शिवसेना 'फोडतील' अशी शक्यता वाटत नाही", असे ट्विट करत क्लाईड क्रास्टो यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना पत्र पाठवले होते. या पत्रातून राज ठाकरे यांनी फडणवीसांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात राज ठाकरेंनी पाठवलेल्या पत्राचा विशेष उल्लेख करत त्यांना फोन करून आभार मानल्याचे सांगितले. त्याचसोबत मी त्यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचे सांगत त्यातून काही राजकीय अर्थ काढू नका, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज ही भेट झाली आहे. 

फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यातील मंत्रिमंडळात मनसेचाही समावेश असेल अशा चर्चा सुरू झाल्या. कारण मनसेच्या एकमेव आमदाराने विधानसभा अध्यक्ष निवडीत, बहुमत चाचणी आणि आगामी राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाला साथ देणार आहे. त्यामुळे मनसे-भाजपा एकत्र येणार असे बोलले जात आहे. त्यात नुकतेच राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना कॅबिनेटमध्ये घेणार असल्याची बातमी समोर आली. मात्र राज ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन केले. पण, आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Web Title: clyde crasto criticizes devendra fadnavis on raj thackeray meets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.