मुख्यमंत्र्यांच्या घोषणा कागदावरच!
By admin | Published: May 12, 2016 04:23 AM2016-05-12T04:23:55+5:302016-05-12T04:23:55+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यात पाणीटंचाई निवारणासाठी अनेक घोषणा केल्या.
लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यात पाणीटंचाई निवारणासाठी अनेक घोषणा केल्या. टँकरने पाणीपुरवठा अन् चर खोदण्याची घोषणा वगळता अन्य अर्ध्या घोषणा कागदावरच आहेत.
मुख्यमंत्र्यांनी भंडारवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी ३७ कोटींचा निधी जाहीर केला होती. शिवाय, मातोळा पाणीपुरवठा योजनेतून लातूरला पाणी आणण्यासाठी २४.४६ कोटी आणि डोंगरगाव प्रकल्पातून पानचिंचोली पाईपलाईनसाठी ४.७६ कोटी, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १५ कोटी, उदगीर पाणीपुरवठ्यासाठी १२ कोटी, मांजरा, साई, नागझरी चर खोदण्यासाठी २ कोटी अशा योजनाही जाहीर केल्या होत्या. त्यापैकी टँकरने पाणीपुरवठा करण्याची योजना तात्काळ अंमलात आली. या योजनेत आतापर्यंत ३ कोटी रुपये मनपाला मिळाले आहेत. तसेच चर खोदण्यासाठी ४ कोटी ७८ लाख रुपये स्थानिक प्रशासनाला मिळाले आहेत. अन्य योजनांच्या ना निविदा आहेत ना पैसे मिळाले. जवळपास अर्ध्या योजना कागदावरच आहेत.
भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा निधी पूर्वी परत गेला होता. मुख्यमंत्र्यांनी या योजनेलाच पुन्हा मंजुरी देऊन ३७ कोटींचा निधी जाहीर केला आहे.