छत्रपती संभाजीराजेंबाबत विकिपीडियावर बदनामी; CM फडणवीस म्हणाले, "असं लिखाण तात्काळ हटवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:56 IST2025-02-18T15:32:58+5:302025-02-18T15:56:39+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची दखल घेत तो हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

CM Devendra Fadnavis takes note of objectionable content on Wikipedia regarding Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजीराजेंबाबत विकिपीडियावर बदनामी; CM फडणवीस म्हणाले, "असं लिखाण तात्काळ हटवा"

छत्रपती संभाजीराजेंबाबत विकिपीडियावर बदनामी; CM फडणवीस म्हणाले, "असं लिखाण तात्काळ हटवा"

Chhatrapati Sambhaji Maharaj : सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विकिपिडियावर जाणीवपूर्वक खोडसाळ माहिती देऊन छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात आला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची दखल घेतली असून विकिपीडियावरील मजकूर हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती संभाजीराजेंबाबत असलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचे म्हटलं आहे.  विकीपीडियावरील मजकुराची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर विभागाच्या प्रमुखांना आयजींना विकीपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीनं हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

"ज्या प्रकारे विकिपीडियावर छत्रपती संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे. या संदर्भात महाराष्ट्राच्या सायबर विभागाच्या प्रमुखांना मी सांगितले की, तात्काळ विकिपीडिया किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या यंत्रणेशी बोलणी करावी आणि ते हटवण्यास सांगावे. जी प्रक्रिया करावी लागेल ती करावी पण अशा प्रकारचे आक्षेपार्ह लिखाण अशा पद्धतीने राहाणं हे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे ते तिथून काढून टाकायला पाहिजे. या दृष्टीने कारवाईचे आदेश दिले आहेत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"विकिपीडिया भारतातून चालवलं जात नाही. हा ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. त्याचे काही नियम आहेत आणि त्यानुसार त्यावर कोण लिहू शकतं याचे अधिकार काही लोकांना असतात. त्यामुळे त्यांना सांगता येईल की ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्यांचे अशा चुकीच्या पद्धतीने लिखाण करणे योग्य नाही. त्याच्यासंदर्भात नियमावली तयार करायला हवी," असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Web Title: CM Devendra Fadnavis takes note of objectionable content on Wikipedia regarding Chhatrapati Sambhaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.