LMOTY 2019: मंत्रिपदाची घाई झालेल्यांना कसं टाळता?; मुख्यमंत्र्यांनी सांगितली गुरुकिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 10:03 PM2019-02-20T22:03:57+5:302019-02-21T16:43:04+5:30
लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची मुलाखत
मुंबई: मुख्यमंत्री म्हणून कधीकधी अभिनय करावा लागतो. राग आलेला नसतानाही चेहऱ्यावर राग दाखवावा लागतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर 2019 या सोहळ्यात अभिनेता रितेश देशमख यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य केलं.
अनेकांना मंत्रीपद हवं असतं, मात्र प्रत्येकाला मंत्रीपद देता येत नाही. मग अशा परिस्थितीला कसं सामोरे जाता, असा प्रश्न रितेशनं मुख्यमंत्र्यांना विचारला. 'अनेकजण मंत्रीपदासाठी माझ्याकडे येतात. प्रत्येक अधिवेशनाच्या आधी खूप आमदार ही मागणी घेऊन येतात. यावर एक युक्ती केली आहे. पुढच्या अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, असं मी येणाऱ्या प्रत्येकाला सांगतो. प्रत्येक अधिवेशनावेळी मी हेच उत्तर देऊन वेळ मारुन नेतो,' असं उत्तर यावर फडणवीस यांनी दिलं.
मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर रितेश देशमुखनं प्रतिप्रश्न केला. प्रत्येक अधिवेशनात तुम्ही मंत्रिपदाची आस बाळगून येणाऱ्याला सारखंच उत्तर देता. त्यावर त्यांचं समाधान होतं का, असं रितेशनं विचारलं. त्यावर साडेचार वर्षे तरी हेच उत्तर देऊन काम चाललं आहे. कारण राजकारण आशेवर चालतं आणि आशा कोणीच सोडत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विविध क्षेत्रातील दिग्गजांचा आज लोकमतकडून गौरव करण्यात आला. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे सहावं वर्षं आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.