जय जिजाऊ... शिवरायांच्या माऊलीपुढे मुख्यमंत्री नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 05:38 PM2019-02-14T17:38:58+5:302019-02-14T17:42:08+5:30
मुख्यमंत्र्यांचं जिजाऊंना वंदन
बुलढाणा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुलढाण्यातील जिजामातांच्या जन्मस्थानाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिजाऊंचं पूजन केलं आणि त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. मातृतीर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेडमध्ये आहे. जिजामाता यांच्या जन्मस्थळाचं आज मुख्यमंत्र्यांनी दर्शन दिलं. 'हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे एक महान राजे ज्यांनी आपल्याला दिले, त्या माऊलीपुढे नतमस्तक होताना एक वेगळीच उर्जा प्राप्त होते,' असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 'जिजाऊंच्या पुतळ्याला हारार्पण केले आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने विनम्र अभिवादन केले. समाजातील तळागाळातील अंतिम माणसाच्या कल्याणाचा जो मार्ग शिवछत्रपतींनी दाखवला, त्याच मार्गावर आपले सरकार काम करीत आहे,' असेदेखील मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
मातृतीर्थ, सिंदखेड!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 14, 2019
माँ जिजाऊ साहेबांचे जन्मस्थान...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे एक महान राजे ज्यांनी आपल्याला दिले, त्या माऊलीपुढे नतमस्तक होताना एक वेगळीच उर्जा प्राप्त होते. pic.twitter.com/gJPsawOECm
सिंदखेडा भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राजवाडा नुतनीकरणाच्या कामाचं आणि विकास आराखड्याचं भूमिपूजन सुद्धा केले. लखुजीराजे जाधव राजवाडा, सावकारवाडा, काळाकोट, नीळकंठेश्वर मंदिर, चावडी, समाधी, रामेश्वर मंदिर, चांदणी तलावाचा विकास सिंदखेड विकास आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याला दुष्काळाला वारंवार सामोरं जावं लागत आहे. पण सरकार ठामपणे शेतकर्यांच्या पाठिशी उभे आहे, असं फडणवीस म्हणाले. 'कर्जमाफी, शेतीपंपाला वीज, विहिरी, शेततळांच्या माध्यमातून शेतकर्यांना मोठा लाभ दिला जात आहे. एकट्या बुलढाणा जिल्हयात अडीच लाखांवर शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आणि अखेरच्या पात्र शेतकर्यांना लाभ मिळेस्तोवर ही योजना सुरूच ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.