देवेंद्र फडणवीसांनंतर आणखीही काही नेत्यांना बसणार झटका? जाणून घ्या, का होतेय गुजरात पॅटर्नची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:19 PM2022-07-26T17:19:45+5:302022-07-26T17:21:08+5:30
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे, की मंत्रिमंडळ स्थापनेत भाजप नेतृत्व गुजरात पॅटर्न लागू करू शकतो.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला तीन आठवडे उलटून गेले आहेत, मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे, गुजरात पॅटर्न महाराष्ट्रातही राबवला जाऊ शकतो, असे बोलले जात असल्याने नेतेमंडळीही सावध झाले आहेत. आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात वाटा देण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, आपल्या संभाव्यतेसंदर्भात या नेत्यांनी अद्याप कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे, की मंत्रिमंडळ स्थापनेत भाजप नेतृत्व गुजरात पॅटर्न लागू करू शकतो. गुजरातमध्ये गेल्या वर्षी, विजय रुपाणी यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री बनविण्यात आल्यानंतर, संपूर्ण मंत्रिमंडळच बदलण्यात आले होते. यात उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अनेक वरिष्ठांना स्थान देण्यात आले नव्हते.
चर्चा आहे, की असाच फॉर्म्युला महाराष्ट्रातही लागू होऊ शकतो. तसेच, जुन्या चेहऱ्यांऐवजी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. अशात महाराष्ट्रातील दिग्गज नेते कुठल्याही प्रकाचे भाष्य करण्याऐवजी शांत राहणेच योग्य समजत आहेत. एवढेच नाही, तर यासंदर्भात प्रश्न विचारला असता, पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडण्यास आपण तयार आहोत, असे ते म्हणत आहेत. पक्षाच्या ज्या नेत्यांना कॅबिनेटमध्ये जाण्याची इच्छा आहे, ते नेते अद्यापही शांतच आहेत. मग भाजप असो अथवा शिवसेनेचा शिंदे गट, सर्वच शांत आहेत. एवढेच नाही, तर हे सर्व जण केंद्राचा मूड समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बोलले जात आहे.
तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीसांसंदर्भातही भाजप नेतृत्वाने आश्चर्याचा धक्का दिला होता. ते मुख्यमंत्री होणार अशीच चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र, राज्यपालांना भेटल्यानंतर, आपण सत्तेपासून दूर राहणार आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, असे फडणवीस यानी म्हटले होते. मात्र, यानंतर, पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्याने ते उपमुख्यमंत्री झाले. यामुळेच सध्या गिरीश महाजन, आशीष शेलार आणि चंद्रकांत पाटिल यांच्यासह अनेक नेते बडे नेते, यासंदर्भात कसल्याही प्रकारचे भाष्य करायला तयार नाहीत.