“कार्तिकी एकादशी शासकीय पूजेच्या परंपरेत खंड पाडण्याचा प्रयत्न करु नये”; CM शिंदेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 03:42 PM2023-11-21T15:42:10+5:302023-11-21T15:45:18+5:30
CM Eknath Shinde Reaction On Kartiki Ekadashi Mahapuja 2023 Clash: कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते. मात्र, यंदा त्यावरून वाद निर्माण झालेले दिसत आहेत.
CM Eknath Shinde Reaction On Kartiki Ekadashi Mahapuja 2023 Clash: कार्तिकी एकादशीला होणाऱ्या शासकीय महापूजेवरून अद्यापही स्पष्टता आलेली नाही. कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नसल्याच्या भूमिकेतून मराठा आणि कोळी समाज आक्रमक झाला आहे. कार्तिकी एकादशीला होणारी शासकीय महापूजेची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. या परंपरेत खंड पाडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
आषाढी आणि कार्तिकी एकदशी ही राज्याची समृद्ध परंपरा आहे. कार्तिकी एकादशीला होणाऱ्या शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांचा आहे. या पूजेला विरोध करण्याची आणि अडथळा आणण्याची संस्कृती नाही. धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. परंपरेत खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला विठ्ठलनामाचा गजर व्हायला हवा, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले आहे.
दोन उपमुख्यमंत्री, पूजेचा मान कुणाला द्यायचा? पेच कायम
गुरुवार, २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. दरवर्षी कार्तिकी एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांच्या हस्ते होत असते . यंदा दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणाच्या हस्ते पूजा होणार हा पेच कायम असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, पंढरपूरमधील विठ्ठलाची शासकीय महापूजा कोणी करायची याविषयीचे वाद मिटण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या एकत्रित बैठक घेण्यात आली. मराठा समाजातील सर्व गट एकत्र आल्यामुळे तोडगा निघण्याची शक्यता आहे. मराठा समाजानंतर कोळी समाजाची बैठक होत आहे. त्यात कोळी समाजाचा विरोध मावळेल, अशी शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, आधी आरक्षण द्या, मगच पूजेला या, अशी आक्रमक भूमिका ज्यांनी घेतली होती, त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. या प्रथेमध्ये आरक्षणाचा मुद्दा येऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांकडून पुढाकार घेतला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना कार्तिकी पूजेसाठी येऊ देणार नाही, अशी भूमिका समाजातील काही मंडळींनी घेतली आहे. ही भूमिका सौम्य व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही जणांना फोन करत समजून काढण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.