एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; "बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 04:38 PM2022-08-25T16:38:51+5:302022-08-25T16:39:18+5:30
होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट घेतलंय, हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट घेतलंय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना लगावला.
मुंबई - तुमचे लोक असताना आमचे लोक होते का? आमचे लोक घोषणा देत असताना तुमचे लोक पुढे गेले. मिटकरी आला आणि कळ काढायला लागला. रोज गद्दार गद्दार, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आपला शत्रू, त्यांना जवळ करण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेन. आम्ही भाजपा-शिवसेना युती म्हणून निवडणूक लढवली. बहुमत मिळालं त्यानंतर अनैसर्गिक आघाडी केली. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी कुणी केली? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, सिल्लोडच्या सभेत लोकांची दुतर्फा गर्दी झाली होती. सगळीकडे लोक बाहेर पडले होते. आम्ही गद्दार असतो तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती. आम्ही घेतलेली भूमिका ही लोकांना पटली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली त्यांच्याशी फारकत घेतली. आम्हाला भाडोत्री फौजफाट्याची आवश्यकता नाही असं त्यांनी म्हटलं.
होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री...
माझा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केला. राज्याचा कुणीही मुख्यमंत्री असू द्या. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलले तेव्हा केंद्रीय मंत्री असताना त्यांना जेलमध्ये टाकून दिले. मुख्यमंत्र्याविरोधात अपशब्द वापरले. या देशाच्या लोकशाहीत घटनेप्रमाणे आम्ही इथं बसलोय. बहुमत सिद्ध करून बसलोय. आम्ही घटनेविरोधात कृत्य करणार नाही. जे अध्यक्ष आहेत त्यांना घटनेचा अभ्यास आहे. वैचारिक पातळी घसरली आहे. होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट घेतलंय, हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट घेतलंय. गोरगरिब जनतेचे अश्रू दूर करण्याचं कंत्राट घेतलंय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं कंत्राट घेतलंय. बहुजनांच्या हितासाठी कंत्राट घेतलंय. असंगाशी विसंगती करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री कधीही बरा असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
केवळ वैचारिक दिवाळखोरी
केवळ वैचारिक दिवाळखोरीतून हिणवणे हेच उद्योग सुरू आहे. प्रत्येकाने मर्यादा सांभाळली पाहिजे. आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ. माझ्याकडे पण टँलेट आहे. माझ्या कलागुणांना कधी व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही. तुम्ही गपचुप जायचे. कानात सांगायचे. एकदा बोलणं झालं की संपलं मग. आणखी पुढेही शिल्लक ठेवायचं आहे. आम्हाला येऊन दीडच महिने झाले. पेट्रोल डिझेलचे दर कमी केले. १४ लाख शेतकऱ्यांना ६ हजार कोटींचे वाटप येत्या सप्टेंबरपासून सुरू होतंय अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.