CM Eknath Shinde Birthday : अनाथांचा नाथ एकनाथ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:10 PM2023-02-09T12:10:03+5:302023-02-09T12:11:47+5:30

अनेक राजकारणी आपला मतदारसंघ, फायदा तोटा मतांची बेरीज वजाबाकी करत काम करत असतात. परंतु असा कोणताही विचार न करता जिथे संकट असेल तिथे एक माणूस पाय रोऊन उभा असतो आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे.

CM Eknath Shinde Birthday Eknath shinde lord of orphans | CM Eknath Shinde Birthday : अनाथांचा नाथ एकनाथ!

CM Eknath Shinde Birthday : अनाथांचा नाथ एकनाथ!

googlenewsNext

गुलाबराव पाटील मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता -

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या स्वागताला किंवा मेळाव्याच्या ठिकाणी एक गाणे हमखास वाजते. या गाण्यातील एक वाक्य आहे. "अनाथांचा नाथ एकनाथ" आणि ही ओळख एकनाथ शिंदेंना सार्थ ठरते, हा माझा ठाम विश्वास आहे. गेली अनेक वर्षांपासून मी शिंदे साहेबांना जवळून पाहत आलो आहे. राजकारण, निवडणुका, सत्ता, यश, अपयश, मान , अपमान या गोष्टी राजकारणात सुरूच असतात परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन संवेदनशीलता जपणारी माणसे समाजात फार कमी आहेत. अनेक राजकारणी आपला मतदारसंघ, फायदा तोटा मतांची बेरीज वजाबाकी करत काम करत असतात. परंतु असा कोणताही विचार न करता जिथे संकट असेल तिथे एक माणूस पाय रोऊन उभा असतो आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे.

पूर परिस्थिती असो व कोणतीही आपती या माणसाची मदत तिथे पोहोचतेच. आरोग्य क्षेत्रातील एकनाथ शिंदे साहेबांचे काम वाखाणण्याजोगे आहे. सर्वसामान्य माणसाला, आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या तर त्याची आर्थिक घडी विस्कटते. अशा परिस्थितीत त्याला योग्य मार्गदर्शनाची व आर्थिक मदतीची गरज असते. हे नेमके ओळखून शिंदे यांनी आरोग्य क्षेत्रात मोठे काम उभे केले. शिंदे साहेबांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत. त्यांचे वैद्यकीय ज्ञान व आरोग्याच्या क्षेत्रात काम करावयाची तळमळ यामुळे शिंदे यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठे काम उभे करू शकले. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले, महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू केले. अब्जावधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होईल व उद्योगधंद्यांना चालना मिळेल यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचे आपण कौतुक करतो पण या सगळ्या निर्णयात सोबत ज्या पद्धतीने त्यांनी सर्वसामान्य माणसाला वैद्यकीय मदत मिळावी या हेतूने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केला. केवळ सुरू केला नाही तर त्याला चालना दिली. मुख्यमंत्री म्हणून या कक्षाच्या पाठीमागे एक ताकद उभी केली आणि आज हजारो रुग्ण या सेवेचे लाभार्थी आहेत. सर्वसामान्य माणसाची नेमकी अडचण शोधून त्यावर काम करण्यासाठी नेतृत्वाकडे संवेदनशील मन असावे लागते याची प्रचिती शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आली.

सन २००४ पासून सातत्याने महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ९ फेब्रुवारी १९६४ रोजी मुंबई येथे एकनाथ शिंदे यांचा जन्म झाला. शिवसेनेतल्या आम्हा सर्व कार्यकत्यांप्रमाणे एकनाथ शिंदे ही सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले, धर्मवीर आनंद दिघे व हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाने प्रभावी झालेल्या शिंदे यांनी आपले जीवन समाजासाठी व संघटनेसाठी झोकुन दिले. आनंद दिघे यांच्या पठडीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी संघटनेच्या कार्यासाठी आपले तारुण्य दिले. हे कार्य करत असताना अनेक अडी अडचणी आल्या, पण त्या अडीअडचणींना शिवसैनिकांनी कधी भीक घातली नाही. नियतीने ही शिंदे साहेबांवर वार करण्याची संधी सोडली नाही. एका अपघातात त्यांना आपल्या पोटचे गोळे गमवावे लागले, पण पहाडासारखा हा माणूस न डगमगता तसाच ठाम उभा राहिला, लढत राहिला आपल्या माणसांसाठी.

ठाणे महानगरपालिकेत आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवल्यानंतर महाराष्ट्राची विधानसभा त्यांची वाट पाहत होती. २००४ साली तीही संधी त्यांना मिळाली. ते पहिल्यांदा आमदार झाले. २०१४ मध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री या पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. २०१९ मध्येच महाराष्ट्र सरकार मध्ये आघाडीचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पदाची संधी त्यांना मिळाली. नगरसेवक पदापासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत येऊन पोहोचली. राजकारणामध्ये प्रचंड यश मिळवलेल्या, संघटना बांधणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या या नेत्याचे पाय आजही जमिनीवर आहेत. त्यांचे कर्तृत्व त्यांची क्षमता व नेता म्हणून अपेक्षित असणारी संवेदनशीलता त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच नियतीने आणखी एक संधी त्यांच्या पारड्यात टाकली आणि ती म्हणजे ३० जून २०१२ रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रिक्षा चालवणारा एक तरुण या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो ही गोष्ट म्हणावी तितकी साधी नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे नावाच कर्तृत्व सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल याचा आम्हा कार्यकर्त्यांना ठाम विश्वास वाटतो.

Web Title: CM Eknath Shinde Birthday Eknath shinde lord of orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.