Maharashtra Politics: “बिल क्लिंटन विचारतात, एकनाथ शिंदे केवढे काम करतात; खातात कधी अन् झोपतात कधी?”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 11:23 AM2022-12-22T11:23:32+5:302022-12-22T11:24:02+5:30
Maharashtra Politics: एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बिल क्लिंटन यांनी आपल्याबद्दल विचारले, असा दावा केला आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी केली. ४० आमदार आणि १२ खासदारांना सोबत घेतले. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस यांचे नवीन सरकार आले. एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने सत्तांतर घडवून आले. ‘महासत्तांतर’ या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक किस्से सांगितले. यावेळी बिल क्लिंटन विचारतात, एकनाथ शिंदे केवढे काम करतात, खातात कधी अन् झोपतात कधी? असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
माझ्याकडे गेल्या एक महिन्यापूर्वी एक माणूस आला होता. तो बिल क्लिंटनकडे राहतो. तो खरा भारतीय आहे. पण त्यांच्याकडे तो आहे. त्याचा नातेवाईक गेला होता. बिल क्लिंटन त्याला म्हणाले. एकनाथ शिंदे, कोण आहे, केवढे काम करतात, कधी खातात, कधी झोपतात, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच काही लोकांना वाटले आम्ही संपलो. पण तसे नाही, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. आजही अनेक जण फार उत्सुकतेने विचारत असतात. पण सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही मुख्यमंत्री पदासाठी हा निर्णय घेतलेला नाही
आम्ही मुख्यमंत्री पदासाठी हा निर्णय घेतलेला नाही. सरकार कुठल्याही सूड भावनेने काम करत नाही. राजकारणात विश्वास आणि कमिटमेंटला फार महत्त्व असते. ५० आमदार एकत्र येणे सोपे नाही. त्यापैकी ९ मंत्री होते. ते सत्ता सोडून आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका त्यांनी घेतली. हेच बलस्थान आहे. मला विश्वास होता की, जी भूमिका आम्ही घेतली ती योग्य होती. राज्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आम्ही केले. मुख्यमंत्रीपद हवे म्हणून हे सगळे बिल्कुल केले नाही, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
दरम्यान, निर्णय घेतला, शब्द दिला तर तो पाळला पाहिजे. मी कधीच घाबरलो नाही. मविआत गेल्यानंतर सर्व आमदारांमध्ये चलबिचल होती. मी सगळ्यांना वेळ देतो म्हणून वेळ लागतो. मी कधीही सूड भावनेने काम करत नाही. मी मदत केली की सांगत नाही. मी कोत्या वृत्तीचा नाही. कोत्या मानसिकतेचा नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"