Gujrat Election Result 2022: गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात दिसेल का? CM एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 06:43 PM2022-12-08T18:43:03+5:302022-12-08T18:44:26+5:30
Gujrat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि गुजरातच्या नागरिकांचे अभिनंदन करतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
Gujrat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि गुजरातच्या नागरिकांचे अभिनंदन करतो. एक चांगला निकाल आला आहे. भाजपला गुजरातमध्ये १५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीमही गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले होते. त्यांचेही मनापासून अभिनंदन करत आणि सर्वांना शुभेच्छा देतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
देशात आणि विदेशात सगळीकडे पंतप्रधान मोदींची जादू आहे
देशात आणि विदेशात सगळीकडे पंतप्रधान मोदींची जादू आहे. आपल्याला जी-२० चे अध्यक्षपदही मिळाले आहे. हे आपल्या देशासाठी गौरवास्पद आहे. जी-२० चे नेतृत्व मोदींनी करणे हीदेखील देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातही मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये १४ बैठका आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं ब्रँडिंग करण्याची संधी प्राप्त झाली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात दिसेल का?
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात दिसेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, आम्ही महाराष्ट्रात भरपूर काम करत आहोत. मुंबईचे सुशोभिकरण सुरू आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर करून कायापालट झाला पाहिजे. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत देशातील-विदेशातील पर्यटक येतात. त्यांना ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या त्या दुर्दैवाने आजपर्यंत मिळाल्या नाहीत. म्हणून आम्ही सरकार बदलले. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे सरकार आहे. मुंबईचाही कायापालट झाला पाहिजे. म्हणून आम्ही स्वच्छता आणि सुशोभिकरणाला प्राधान्य दिले. लवकरच हे दृश्य स्वरुपात दिसेल आणि मुंबईकरांना लाभ होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"