“मुखी भवानी अन् पोटात बेईमानी”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 22:53 IST2024-04-23T22:53:16+5:302024-04-23T22:53:30+5:30
CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदींची १० वर्षे म्हणजे भारताचा सुवर्ण काळ आहे. कातडे पांघरुन वाघ होता येत नाही. जनतेला असली व नकली वाघ बरोबर कळतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“मुखी भवानी अन् पोटात बेईमानी”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका
CM Eknath Shinde News: तोंडात भवानी, पोटात बेईमानी, बाप एक नंबरी, तो बेटा दस नंबरी, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासह ठाकरे पितापुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला. महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
वाघाचे कातडे घालून वाघ होता येत नाही. जनतेला असली व नकली वाघ बरोबर कळतो. २०१९ मध्ये त्यांनी युतीशी बेईमानी केली, बाळासाहेबांच्या तत्त्वांशी आणि युतीला बहुमत देणाऱ्या जनतेशी, मतदारांशी बेईमानी केली. खरे गद्दार ते असून आम्ही बाळासाहेब यांच्या विचारांचे वारसदार आहोत. पंतप्रधान मोदींची दहा वर्षे म्हणजे भारताचा सुवर्ण काळ आहे. या दहा वर्षांची काँग्रेसच्या साठ वर्षांच्या राजवटीशी तुलना केली तर ती हिमालय विरुद्ध छोटी टेकडी अशी ठरेल, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.
मी शेतकरीपुत्र, माझा अपमान हा तमाम शेतकऱ्यांचा अपमान आहे
मी शेतकरीपुत्र आहे. त्यामुळे माझा अपमान हा तमाम शेतकऱ्यांचा अपमान आहे. मी ज्या समाजाचा आहे, त्या समाजाचा घोर अपमान आहे, असे सांगत मी डॉक्टर नसताना अनेक ऑपरेशन केली. त्यांचा मानेचा पट्टा गेला, मात्र पाठीचा कणा वाकडाच राहिला. कालपरवा ठाकरे मला अपशब्द म्हणाले. मी मुख्यमंत्री झालो, कामे करतो म्हणून त्यांचा जळफळाट झाला, त्यांना ते असह्य होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यंदाची निवडणूक देशासाठी निर्णायक असल्याचे सांगून देशाचा विकास, पुढील दिशा ठरविणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध ‘इंडिया’चे २६ पक्ष, अशी लढत आहे. विरोधकाकडे काहीच मुद्दे नसल्याने ते काहीही बरगळत आहेत. मोदींनी चारशे पार केले तर म्हणे संविधान बदलणार, मात्र तसे काही नसून चंद्र-सूर्य असेपर्यंत संविधान बदलणार नाही, ही मोदींची ‘गॅरंटी’ असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.