विरोधक आक्रमक, कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस बांधावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 06:14 AM2023-12-08T06:14:21+5:302023-12-08T06:16:41+5:30

मौदा तालुक्यातील शेतीची केली पाहणी

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis and Dhananjay Munde Visited farmers whose farms have suffered due to unseasonal rains | विरोधक आक्रमक, कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस बांधावर

विरोधक आक्रमक, कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस बांधावर

कमलेश वानखेडे

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विरोधकांनी शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असल्याची टीका केली. तर सभागृहाचे कामकाज संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. मौदा तालुक्यातील तारसा निमखेडा या गावांना भेटी देत त्यांनी शेतीची पाहणी केली.

गुरुवारी विधानसभेचे कामकाज तहकुब होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची चर्चा केली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार कृपाल तुमाने, आ. आशिष जायस्वाल, आ. टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्यासह कृषी, पणन, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यात २६ ते २८ नोव्हेंबर या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जवळपास १२४ गावांना फटका बसला व ८५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान मौदा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे झाले. रामटेक, पारशिवणी तालुक्यातही नुकसान झाले. धानासोबतच कापूस, तूर, संत्रा पिकांचेही नुकसान झाले. 

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : फडणवीस 
केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. इतर तालुक्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली. १२०० मंडळे दुष्काळसदृश जाहीर केली. त्यांनाही दुष्काळाच्या धर्तीवरच मदत करण्यात आली. मागे १० हजार कोटी दिले. यावर्षीही २० लाख शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम दिले, असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले ते म्हणाले, दुष्काळ, गारपीट, अवकाळी नुकसान अशा सर्व प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने कारवाई सुरू झाली आहे. मागे शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत केली. राज्य सरकारने मदतीसाठी दोन ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा वाढवली असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

Web Title: CM Eknath Shinde, Devendra Fadnavis and Dhananjay Munde Visited farmers whose farms have suffered due to unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.