Sanjay Raut | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 'गुंगाराम'- संजय राऊतांची बोचरी टीका
By दीपक देशमुख | Published: December 18, 2022 04:27 PM2022-12-18T16:27:11+5:302022-12-18T16:27:55+5:30
"जनतेचा उद्रेक झाला तरी तोंड उघडत नाहीत"
लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय तसेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होत असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प आहेत कारण ते गुंगाराम आहेत. ते दिल्लीला जावून गुंगीचे इंजेक्शनर घेवून येतात. जनतेतून उद्रेक झाला तरी तोंड न उघडण्याच्या अटीवरच त्यांना केंद्राने सत्तेवर बसवले आहे. मुख्यमंत्री शिंदे तर हेलीकॉप्टर मंत्रीच आहेत, साताऱ्यात त्यांची दोन हेलीपॅड आहेत, अशी टोलेबाजी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
सातारा येथे खासगी दौऱ्यानिमित्त सातारा आलेले असताना राऊत विश्रामगृहावर थांबले होत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत जातात. तेथे दिल्लीश्वरांनी गुंगीचे औषध दिले की येथे येवून गुंगाराम होतात. गुंगी उतरली की पुन्हा दिल्लीला जातात. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबाबत बोलायचे नाही, या अटीवर त्यांना सत्तेवर आणले आहे. महाराष्ट्ख्च्या दैवतांचा अवमान झाला, यामुळे जनतेत उद्रेक झाला तरी दोघांनी तोंडं उघडायची नाहीत, या अटीवर त्यांना सत्तेवर बसवले आहे.
राऊत म्हणाले, मुंबईतला विराट मोर्चा सरकारविरोधी नव्हता तर महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात होता. फडणवीस यांनी मोर्चाला सामोरे जायला हवे होते. परंतु, त्यांनी नॅनो म्हणून मोर्चाला हिणवले. हे राज्यकर्ता असल्याचे लक्षण नाही. कालचा मोर्चा ज्यांना दिसला नाही त्यांच्यात पराकोटीचा महाराष्ट्रद्वेष आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तत्कालिन सत्ताधारी काँग्रेसचे नेतेही आतून चळवळीचे समर्थनच करत होते. कालाचा विराट मोर्चा हा इशारा मोर्चा आहे. नागपूरच्या अधिवेशनात राज्य सरकारची लकतरे काढली जाणार आहेत. केंद्राने राज्यपालांना मागे बोलावलं नसलं तरी लाखो लोकांच्या विराट मोर्चाने राज्यपालांना बडतर्फ केले आहे.
अमित शाह यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मध्यस्थी केल्याबाबत त्यांना छेडले असता राऊत म्हणाले, जैसे थे परिस्थिती निर्माण करणे ही मध्यस्थी नव्हे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यापासून जैसे थे परिस्थिती आहे. हे शहांना माहीत नाही काय? महाराष्ट्राला नॅनो बुद्धीचे समजला काय? हा ज्ञानोबांचा महाराष्ट्र आहे. बेळगाव महापालिकेवरील छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा कन्नड सरकारने उतरवला, तो पुन्हा फडकावा, मराठी लोकांवर खोटे गुन्हे मागे घ्यावेत. बेळगावातील वीस लाख सुशिक्षित मराठी लोकांना कन्नड येत नसल्यामुळे अंगठा लावावा लागतो. तेथील सरकारी दफ्तर मराठी भाषेत घ्या. हे केले की मग जैसे परिस्थिती होईल. सत्तर वर्षांचा हा प्रश्न आहे पण बैठक पंधरा मिनिटात बैठक संपते कशी असा सवाल राऊत यांनी केला. नीतेश राणेंच्या लहान माणूस, त्यावर बोलू नका, असे सांगत त्यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.
नॅनो सरकार लवकर पडणार
शिंदे-फडणवीस सरकार नॅनो सरकार आहे. नॅनो गोष्टी फार काळ टिकत नाही. नॅनो हा फडणवीस यांचाच शब्द आहे. हे सरकार नॅनो बुद्धीचे आहे. जशी नॅनो गाडीची निर्मिती बंद झाली तसेच हे सरकारसुद्धा पडणार असल्याचे राऊत म्हणाले.
खासदार उदयनराजे यांच्या भूमिकेचे सर्वप्रथम शिवसेनेकडून समर्थन
राज्यपालांनी छत्रपती शिवरायांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी जी भुमिका घेतली त्याचे सर्वप्रथम शिवसेनेने समर्थन केल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यांच्या डोळ्यात जेव्हा प्रथम अश्रू आले ते मी महाराष्ट्राचे अश्रू असल्याचे प्रथम सांगितले. खासदार उदयनराजे ज्या पक्षात आहेत तो पक्ष मूकबधीर झाला आहे.