मुख्यमंत्री शिंदेंविरोधात बोलाल तर चुन चुन के, गिन गिन के मारेंगे; आमदाराचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 11:48 AM2022-09-04T11:48:57+5:302022-09-04T11:49:43+5:30
शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ठेवला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले.
बुलढाणा - शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पाहायला मिळत आहे. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. त्यात आता शिंदे-ठाकरे गट एकमेकांना भिडत असल्याचं चित्रही समोर आले आहे. बुलढाण्यात शिंदे-ठाकरे गटाचे समर्थक आमनेसामने आले आणि एकच राडा झाला. या घटनेनंतर शिंदे गटाच्या आमदाराने ठाकरे गटाला इशारा दिला आहे.
शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड म्हणाले की, ठाकरे गटातील लोक पातळी सोडून टीका करत आहेत. आता तर राडा कमी झाला. पोलिसांनी थांबवलं. आमचे कार्यकर्ते खूप जमा होते. आम्हाला चिथावणीखोर भाषा वापरता परंतु त्यांना संजय गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते माहिती नाही. यानंतर जर अशाप्रकारे विधाने केली तर चुन चुन के, गिन गिन के मारेंगे असा इशारा त्यांनी दिला आहे.
नेमके काय घडले?
शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ठेवला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले. तेथील खुर्च्यांची तोडफोड करत ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत संजय हाडे, गाडेकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही, बुलढाणा हे बिहार नाही
अशा पद्धतीचे हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही. बुलढाणा हे बिहार नाही. शिवसेनचे काम सातत्यपूर्ण काम करत आहे. आम्ही कार्यरत राहू. पोलिसांनीही योग्य कार्यवाही न केल्यास संपूर्ण जि्ल्ह्यात याचा उद्रेक उमटेल, असे जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत म्हणाले. आम्ही पोलिस प्रशासनाची वाट पहाणार आहोत. हल्ले करणाऱ्यांची नावेही पोलिसांना देण्यात येणाऱ्या रिपोर्टममध्ये देण्यात येणार असल्याचे बुधवत यांनी सांगितले.
शिंदे गटातील आमदारांची चिथावणीखोर विधाने
अलीकडेच शिंदे गटातील मागठणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनीही धमकी देणारं विधान केले होते. सुर्वे यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना म्हटलं की, कुणी आपल्याला काही बोललं तर ठोकून काढा, कापून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, दुसऱ्या दिवशी मी टेबल जामीन करून देतो. कोथळा काढल्याशिवाय सोडणार नाही, अशा चिथावणीखोर वाक्यांचा उल्लेख होता. त्यानंतर विरोधकांनी यावरून सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडलं होते.