सोज्वळ चेहऱ्यामागे काय प्रकार चालतात हे कळलं; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 11:38 AM2022-08-03T11:38:50+5:302022-08-03T12:09:44+5:30
माझी कार कुठल्याही शिवसैनिकाने थांबवली नाही. सिग्नलला कार थांबल्यानंतर बाजूला २ गाड्या उभ्या होत्या. त्यातून काही तरूण उतरले त्यांच्या हातात हत्यारं, दगडे होती.
मुंबई - माझ्यावर जो भ्याड हल्ला झाला त्यातून मी वाचलो आहे. लोकशाहीत जर कुणी उठाव केला तर त्याच्यावर हल्ला करणं दुर्दैवी आहे. मी शांत आहे कारण माझ्यावर संस्कार आहे. राजकारण आरोग्यदायी असले पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत सांगितले. परंतु हे राजकारण समोरच्याचं आरोग्य बिघडवण्यासाठी आहे. एखाद्या सभेला हत्यारं घेऊन जातात का? असा सवाल माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी विचारला आहे.
उदय सामंत म्हणाले की, माझी कार कुठल्याही शिवसैनिकाने थांबवली नाही. सिग्नलला कार थांबल्यानंतर बाजूला २ गाड्या उभ्या होत्या. त्यातून काही तरूण उतरले त्यांच्या हातात हत्यारं, दगडे होती. कशाप्रकारे माझी काच फोडली गेली. त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. राजकारण किती खालच्या स्तरावर जाते हे कालचं उदाहरण आहे. हा उत्स्फुर्त प्रतिसाद आहे असं सुभाष देसाई म्हणतात आणि निलम गोऱ्हे म्हणतात हे शिवसैनिक नाहीत हे संभ्रमाचं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करण्यासारखं आहे. विचार पटला नाही म्हणजे ठार मारणं हा लोकशाहीचा स्तंभ नाही. परंतु काल सोज्वळ चेहऱ्यापलीकडचे प्रकार काय चालतात ते पाहिले आहे असं आरोप त्यांनी केला.
तसेच विकासाच्या कामातून आम्ही उत्तर देऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्याच विचाराने आम्ही काम करतोय. मुख्यमंत्री त्याच मार्गाने जाणार होते असं सांगितले जात होते. या सर्व गोष्टीचा महाराष्ट्र पोलिसांनी विचार केला पाहिजे. २-३ व्यक्तीने पांढरे शर्ट घातलेले होते. ज्या नेत्याची सभा होती. त्यात काठ्या, चाबुक देणार आहोत अशी विधाने केली गेली. दैव्य बलवत्तर होतं म्हणून तुमच्यासमोर बोलतोय. नाहीतर माझ्या आईवडिलांना मुलाबद्दल प्रतिक्रिया विचारावी लागली असती. जे जे कुणी स्टेटमेंट देतात त्याकडे लक्ष द्यावं. जनतेच्या आशीर्वादामुळे मी सुखरुप आहे असं उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, आम्ही एकनाथ शिंदेंसारख्या शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्री बनवलं, तुम्ही गद्दार म्हणाला तरी शांत आहे. आईवडिलांना शिव्या घातल्या तरी शांत आहे. परंतु आम्ही शांत म्हणजे हतबल नाही. आमच्यावर संस्कार आहेत. मी असाह्य नाही. काल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ होत होती. राजकारणाची लढाई विचारांची असायला हवी. विचाराचा प्रतिकार विचारानेच व्हावा. ज्यांनी हल्ला केला ते जेलमध्ये जातील. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे कोण उभं राहणार आहे? आता ती कुटुंब वाऱ्यावर पडली. आम्ही सेना स्टाईलने उत्तर देऊ. दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. मी संयम पाळतोय. कर्माची फळे भोगावी लागणार आहे. मीदेखील काही सांगू शकतो असा इशारा उदय सामंत यांनी दिला आहे.
असा मुख्यमंत्री होणे नाही
एकनाथ शिंदे यांच्याबाबत जो आदर होतो तो दुपटीने वाढला. माझी मेडिकल टेस्ट होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यासोबत होते. कुटुंबापेक्षा जास्त एकनाथ शिंदे यांनी जपलं. मनाचा मोठेपणा दाखवत पुढचे कार्यक्रम रद्द केले. सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून ते शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिले. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली संस्कृती ही खरी राजकीय संस्कृती आहे. असा मुख्यमंत्री होणे नाही अशा शब्दात उदय सामंत यांनी शिंदे यांचे कौतुक केले आहे.