'मातोश्री' बाहेर निधन झालेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबासाठी एकनाथ शिंदे सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 08:44 AM2022-07-13T08:44:02+5:302022-07-13T08:45:06+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे माजी आमदार काही पदाधिकारी काळे कुटुंबाच्या घरी पाठवले त्यांनी तातडीने या कुटुंबाला ३ लाखांची आर्थिक मदत दिली.
ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने मातोश्री आणि शिवसेना भवन येथे शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर बैठकीसाठी आलेल्या शिवसैनिकाची तब्येत अचानक ढासळली. मातोश्रीबाहेरच या शिवसैनिकाचे निधन झाले. या शिवसैनिकाच्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले आहेत.
कसारा येथे राहणाऱ्या भगवान काळे यांचा मृत्यू मातोश्री निवासस्थानाबाहेर झाला. ६ जुलैला मातोश्रीवर बैठकीसाठी गेले असताना त्याठिकाणी काळे यांना ह्दयविकाराचा झटका आला. या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि ठाणे जिल्हा शिवसेना सचिव साईनाथ तारे यांच्या माध्यमातून काळे कुटुंबियांना आर्थिक मदत पोहचवली. त्याचसोबत फोनवरून या कुटुंबाचं सांत्वन केले. भगवान काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली.
भगवान काळे कुटुंबाच्या सात्वनासाठी एकही ठाकरे गटातील नेता पोहचला नाही. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना खासदार संजय राऊत हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कसारामार्गे ते नाशिकला गेले परंतु भगवान काळे कुटुंबाच्या भेटीसाठी त्यांनी वेळ काढला नाही. मातोश्रीवरूनही काळे कुटुंबाच्या चौकशीसाठी फोन केला नाही अशी चर्चा कसारा येथील शिवसैनिकांमध्ये सुरू होती. मात्र या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे माजी आमदार काही पदाधिकारी काळे कुटुंबाच्या घरी पाठवले त्यांनी तातडीने या कुटुंबाला ३ लाखांची आर्थिक मदत दिली. त्यातील १ लाखाचा चेक शिवसेना नेत्यांनी पीडित कुटुंबांच्या हाती दिला. तर लहान मुलांच्या शिक्षणासाठी २ लाखांची आर्थिक मदत केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून पीडित कुटुंबाशी संवाद साधला. तसेच यापुढेही काही मदत लागल्यास कळवावं असं त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शिवसैनिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.