मुख्यमंत्र्यांची सर्व खासदारांसोबतची बैठक म्हणजे 'वरातीमागून घोडे'; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 05:14 PM2023-01-30T17:14:29+5:302023-01-30T17:14:57+5:30

"मुख्यमंत्र्यांना नक्की 'हे' आठवते का?"

CM Eknath Shinde meeting with all MPs is just a PR exercise says NCP Mahesh Bharat Tapase | मुख्यमंत्र्यांची सर्व खासदारांसोबतची बैठक म्हणजे 'वरातीमागून घोडे'; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांची सर्व खासदारांसोबतची बैठक म्हणजे 'वरातीमागून घोडे'; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

Eknath Shinde vs NCP: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यापासूनच एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने खडाजंगी पाहायला मिळाली आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे नेतेमंडळी शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्नशील होते, असा दावा शिंदे गटाने अनेकदा केला. त्यानंतर विधीमंडळातही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना विविध तरतुदींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत महाराष्ट्राच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. पण अशा प्रकारची बैठक म्हणजे 'वरातीमागून घोडे' असेच म्हणावे लागेल, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.

केंद्रीय अर्थसंकल्प दिनांक १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. फक्त एक दिवस बाकी असताना, महाराष्ट्राच्या विकासासाठी खासदार केंद्रीय अर्थसंकल्पात सूचना कशा जोडू शकतात, याबाबत आश्चर्य व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांना दिनांक १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प आहे हे आठवते का? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील विकास कामांबाबत जर गंभीर असते तर त्यांनी किमान महिनाभरापूर्वी सर्व खासदारांची बैठक बोलावायला हवी होती आणि केंद्रसरकारच्या सर्व प्रकल्पांचा आणि विविध योजनांसाठीच्या आर्थिक वाटपाचा आढावा घ्यायला हवा होता आणि त्यानंतर अर्थमंत्रालयाकडे सूचना पाठवायला हव्या होत्या असेही महेश तपासे म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे पब्लिसिटी स्टंटशिवाय दुसरे काही नाही अशी टीकाही महेश तपासे यांनी केली.

Web Title: CM Eknath Shinde meeting with all MPs is just a PR exercise says NCP Mahesh Bharat Tapase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.