आता नो क्लोजर, फक्त बुलडोझर; राज्यातील अवैध पब, बारवर कारवाईचे CM एकनाथ शिंदेंचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 05:58 AM2024-06-29T05:58:51+5:302024-06-29T05:59:31+5:30
मुख्यमंत्र्यांनी ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील अशा बांधकामांवर कारवाईचे निर्देश दिले होते.
मुंबई - ठाणे आणि मीरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दोन दिवसांपूर्वी दिल्यानंतर आता संपूर्ण राज्यातील अशा अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस दल आणि प्रशासनाला दिले आहेत. अनधिकृत बांधकामे आणि अमली पदार्थविरोधी कारवाई करताना बेधडक बुलडोझर चालवा, बुलडोझर चालवताना कोणालाही सूट देऊ नका, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील जे अधिकारी अशा बांधकामांवर कारवाई करताना दिरंगाई करतील त्यांच्यावर कारवाईचे आदेश वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. पुण्यातील पबमध्ये अमली पदार्थ सेवन करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रशासनाने पुण्यातील अनधिकृत पब आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर कारवाई केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील अशा बांधकामांवर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार कारवाई सुरू झाली. आता राज्यभर अशा कारवाईचे निर्देश आहेत.