खड्डे त्वरित भरा मुख्यमंत्र्यांचे आदेश; मुंबई, ठाण्यातील खराब रस्त्यांचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 06:39 AM2022-07-07T06:39:37+5:302022-07-07T06:40:01+5:30

मुंबई तसेच ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम असून, संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली.

CM Eknath Shinde orders to fill pits immediately; Review of bad roads in Mumbai, Thane | खड्डे त्वरित भरा मुख्यमंत्र्यांचे आदेश; मुंबई, ठाण्यातील खराब रस्त्यांचा आढावा

खड्डे त्वरित भरा मुख्यमंत्र्यांचे आदेश; मुंबई, ठाण्यातील खराब रस्त्यांचा आढावा

Next

ठाणे : घोडबंदर रोडवरील काजूपाडा या ठिकाणी खड्ड्यांमुळे पहिला बळी गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी यंत्रणा आणि पालिका अधिकाऱ्यांची बुधवारी चांगलीच कानउघाडणी केली. संभाव्य आपत्तीला तोंड देण्याकरिता सतर्क राहण्याचा सूचना देण्याबरोबरच त्वरित खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर काम केल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळविता येईल, असा टोलाही त्यांनी अधिकाऱ्यांना लगावला.  

मुंबई तसेच ठाणे परिसरात पावसाचा जोर कायम असून, संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. यावेळी त्यांनी ठाणे जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत आढावा घेतला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, ठाणे जिल्हा आणि शहराशी निगडित विविध यंत्रणांचे, विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे बरोबर समन्वय ठेवण्यास सांगितले. तिन्ही धरणांच्या क्षेत्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवा. धरणांमधून पाणी सोडण्यात येणार असेल तर गेट उघडण्याबाबत तसेच बंद करण्याबाबत पूर्वकल्पना द्या, धरणावरील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना द्या, ज्या गावांचे स्थलांतर रखडले आहे ते तातडीने करा. विशेषतः सावळसे गावाला जागा दिली आहे. या गावाबाबत सर्व यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना केली.

कोल्ड मिक्स पद्धतीने खड्डे भरा   
खड्ड्यांमुळे अपघात होऊन कुणी जखमी होऊ नये, याची प्रामुख्याने दक्षता घ्या. त्यातच खड्डे कोल्ड मिक्स पद्धतीने भरण्याबरोबर रस्ते दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

पुराच्या ठिकाणी जीवितहानी टाळा 
पूर परिस्थितीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा आणि पूर येणाऱ्या भागात जीवितहानी होऊ नये याची दक्षता घ्या. त्याचबरोबर लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी ठेवा. तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागातील लोकांनाही सुरक्षित स्थळी हलवा. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करा, असे शिंदे म्हणाले.  

नोडल ऑफिसरची नियुक्ती करा
रेल्वेच्या यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देताना, मुंबई महापालिकेशी समन्वय राखा, पाणी साचून रेल्वे सेवा विस्कळित झाल्यास प्रवाशांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्या. यासाठी एक समन्वयक अधिकारी (नोडल ऑफिसर) नियुक्त करावा. प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्ट, एसटी बस किंवा स्थानिक परिवहन सेवा यांची मदत घ्या, अशा सूचना दिल्या. लोकांना वेळच्या वेळी माहिती देण्याची व्यवस्था करा. संपर्क आणि समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करा, असे निर्देश दिले. पालघर जिल्ह्यातील परिस्थितीचाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत आढावा घेत तेथील अतिवृष्टीची माहिती घेतली. 

महावितरणालाही सज्ज राहण्याचा सूचना
पावसाळ्यात वीजपुरवठा अखंडित, सुरळीत राहण्यासाठी सज्ज राहा. 
लोकांनी फोन केल्यास त्यांना प्रतिसाद मिळेल याची काळजी घ्या. त्यांची तक्रार नोंदवून घेण्याची व्यवस्था करा. 
तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी, यंत्रणांना आवश्यक सुविधा, उपकरणे तातडीने पुरविण्यात याव्यात, असे शिंदे म्हणाले.

आपत्तीच्या वेळी प्रत्येकाने आपापले काम चोखपणे पार पाडल्यास लोकांचा रोष ओढवणार नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासनाने धावल्यास चांगली कामे होतील. मी स्वतः राज्यातील जनतेचा लोकसेवक म्हणून काम करतो. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करावे. मृतांच्या नातेवाइकांना देण्यात येणारी मदत तातडीने पोहोचवावी; तरच शासन आपल्या दारात आले, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होईल.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

 

Web Title: CM Eknath Shinde orders to fill pits immediately; Review of bad roads in Mumbai, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.