“विरोधक PM मोदी द्वेषाने पीडीत आहेत, सलग तिसऱ्यांदा जनताच आता उत्तर देईल”: CM शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:33 PM2024-04-15T17:33:43+5:302024-04-15T17:34:40+5:30
CM Eknath Shinde News: या निवडणुकीत राष्ट्रभक्ती आणि देशाचा विकास डोळ्यासमोर एकजुटीने लढायचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
CM Eknath Shinde News: विरोधक पंतप्रधान मोदींच्या द्वेषाने पीडीत आहेत. २०१४ आणि २०१९ प्रमाणेच २०२४ च्या निवडणुकीत जनता विरोधकांना मतपेटीतून उत्तर देईल. ६० वर्षे सत्तेत असताना काँग्रेसला कधी संविधान दिन साजरा करण्याचे सुचले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ पासून संविधान दिन सुरु केला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोवर संविधान कधीही बदलणार नाही, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना ठणकावले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील विविध भागांमध्ये दौरे करत आहेत. प्रचारसभा घेऊन मतदारांना संबोधित करत आहेत. तसेच महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती देत आहेत. महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा, शासन आपल्या दारी असे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतले. कोल्हापूरकर शब्दाला पक्के आहेत. ते महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवला. कोल्हापुरात ४२ डिग्री तापमान असून महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीचा अलोट महासागर आज कोल्हापुरकरांनी पहिल्यांदा बघितला असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोल्हापुरातील मुख्य रस्ते, गल्ली, बोळ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहत होते.
कोल्हापुरातील महापुर निवारण्यासाठी ३५०० कोटींचा आरखडा शासनाने मंजूर केला
कोल्हापूर शक्तिपीठ महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. ही निवडणूक एका व्यक्तीची नाही, एका मतदारसंघाची नाही तर ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारी निवडणूक आहे. पंचगंगेचे प्रदूषण थांबवल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी राज्य सरकारने ३२०० कोटींचा प्रकल्प तयार केला आहे. कोल्हापुरातील महापुर निवारण्यासाठी ३५०० कोटींचा आरखडा शासनाने मंजूर केला आहे. राज्यातील महायुतीचे सरकार झपाट्याने काम करत आहेत. हे सरकार घरात बसणारे, फेसबुकवरुन काम करणारे सरकार नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रभक्ती आणि देशाचा विकास डोळ्यासमोर एकजुटीने लढायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था केवळ मजबूत केली नाही तर ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणली. आता भारताला तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे जगभरात भारताचा मानसन्मान वाढला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.