छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? CM शिंदे म्हणाले, "नौदलाचे अधिकारी...";
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 06:52 PM2024-08-26T18:52:18+5:302024-08-26T19:04:21+5:30
CM Eknath Shinde : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
Chatrapati Shivaji Maharaj Statue : नौदल दिनानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभ्यारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केलं होतं. त्यानंतर आता पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या प्रकाराबाबत भाष्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे राजकोट किल्ल्यावर नौदल दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. त्यावेळी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्धघाटन पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते करण्यात आलं होतं. मात्र हा संपूर्ण पुतळा अचानक कोसळला. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप अस्पष्ट होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा कोसळ्याचे कारण सांगितलं आहे. तसेच पुन्हा त्याच जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती लवकरच उभा करु असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.
"झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि य कार्यक्रमाला आम्हीसुद्धा उपस्थित होतो. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. हा पुतळा नौदलाने उभारला होता. त्याची संपूर्ण रचना नौदलाने तयार केली होती. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की, ४५ किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामध्ये पुतळ्याचे नुकसान झालं. उद्याच तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत. पुन्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा करण्याचे काम आम्ही करु," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकाराबाबत टीका केली होती. "सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी आमची मागणी आहे," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. त्यावर बोलताना सुप्रिया सुळेंना टीका करायला वेळच वेळ आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
दरम्यान, नौदल दिनानिमित्ताने मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून हा पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं होतं. मात्र वर्षभरातच हा पुतळा कोसळला.