Maharashtra Political Crisis: “...तर त्याची चौकशी करा”; संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या ‘त्या’ १० लाखांवरुन CM स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:00 PM2022-08-02T12:00:54+5:302022-08-02T12:02:03+5:30
Maharashtra Political Crisis: संजय राऊतांकडे सापडलेल्या रोख १० लाखांच्या बंडलावर नाव आढळून आल्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट भूमिका मांडली आहे.
Maharashtra Political Crisis: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. यानंतर ईडीने संजय राऊतांना न्यायालयासमोर हजर केले. तेथे दोन्ही बाजूने झालेल्या जोरदार युक्तिवादानंतर संजय राऊत यांना ०४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. मात्र, यातच संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या पैशांच्या एका बंडलावर एकनाथ शिंदे यांचे नाव आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत हे ईडीला सहकार्य करत नव्हते. यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. काही कागदपत्रेही ईडीने या कारवाईत जप्त केल्याची माहिती आहे. ही रोख रक्कम जप्त केल्यानंतर संजय राऊत यांना ही कॅश कुठून आली, याची विचारणा करण्यात आली. त्याच्यावर संजय राऊत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, अशी माहिती आहे. संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या ११ लाख रुपयांच्या रोख रकमेपैकी १० लाख रुपयांच्या एका बंडलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आढळून आल्याचे सांगितले जात आहे.
ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांची चौकशी करा
संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या कारवाईत पैश्यांच्या बंडलवर माझे नाव होते. तर त्याची चौकशी करा. या प्रकरणामध्ये माझी चौकशी करण्यापेक्षा ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांची चौकशी करा, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच माझ्या दोन दिवसाच्या दौऱ्यांमध्ये सर्व विभागीय आयुक्तांच्या बैठका होत आहेत. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतल्या जात आहेत. तातडीने जे प्रश्न सोडवायचे ते सोडवण्यावर भर दिला जात आहे. दौराचा चांगला इम्पॅक्ट लोकांकडून मिळाला आहे. काही निर्णय प्रक्रियेमध्ये थांबले होते, त्याला चालना मिळाली आहे. पुण्यातही अशा प्रकारचा दौरा आहे. यामध्ये पुण्यातील कामाचा आढावा घेणार आहे. शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न त्याच्या आढावा घेतला जाणार आहे. काही कामे प्रालंबित आहेत, त्याच्या लवकरात लवकर निपटारा पूर्ण केला जाईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत तसेच ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी ईडीला दिल्याचे समजते. मात्र, अधिकाऱ्यांना झडतीत दुसरी काही कागदपत्रे सापडली आहेत. एकनाथ शिंदे यांची अयोध्येच्या राम मंदिराला देण्याची ही रक्कम राऊतांनी घरात का ठेवली? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.