CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 08:53 PM2024-09-23T20:53:03+5:302024-09-23T20:53:58+5:30
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter in Badlapur Case: चिमुरड्या मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी असलेला आरोपी अक्षय शिंदे आज पोलीस चकमकीत ठार
CM Eknath Shinde on Badlapur Case Accused Akshay Shinde Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरे पोलिसांच्या व्हॅन मधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसाची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला. यात आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
"बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी गुन्हेगार अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्याच्या तपासासाठी आणत असताना त्याने पोलिसांची बंदूक खेचून पोलिसांवर फायरिंग केली. त्यात एपीआय निलेश मोरे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ बचावासाठी गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. आता पोलिस तपासात वस्तुस्थिती डिटेलमध्ये समजून येईल," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
"ज्या व्यक्तीने लहान मुलींवर अत्याचार केला, ज्याने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले, अशाप्रकारच्या आरोपीची बाजू घेणे दुर्दैवी आणि निंदाजनक आहे. विरोधी पक्षाला काहीच बोलायचा अधिकार नाही. बलात्कारी व्यक्तीला फाशी द्या असे तेच म्हणत होते. त्यामुळे आता त्यांनी असे बोलणे निंदनीय आहे. या घटनेत एपीआय दर्जाचा पोलिस अधिकारी जखमी झाला आहे. जे पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तास कर्तव्यावर असतात, त्यांच्यावर विरोधकांनी आक्षेप घेणे दुर्दैवी आहे. पोलिसांनी स्वत:च्या बचावासाठी जी कारवाई केली त्याचा तपास होईल आणि समोर येईल. निवडणुकीचा याच्याशी संबंध नाही. विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. म्हणून ते असे आरोप करत आहेत," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नक्की काय घडला प्रकार?
आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांच्या व्हॅनमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस व्हॅनमध्ये शेजारी पोलिस बसला होता. त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने पोलिसाची बंदूक हिसकावून घेत स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची माहिती सुरुवातीला मिळाली होती. पण त्यानंतर त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली. अक्षयने पोलिसांच्या बंदुकीने गोळीबार केला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या वेळी अक्षयच्या गोळीबारापासून वाचवण्यासाठी पोलीसांनीही गोळीबार केला. त्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.